ठाणे प्रतिनिधी (नागेश पवार) दिवा : स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने शहरात स्वच्छतेचे फलक लावण्याचा सपाटा लावला आहे. दिवा-आगासन रोडवर असेच काही फलक नुकतेच झळकले आहेत, ज्यावर ‘या परिसरात दररोज दोन वेळा साफसफाई केली जाते’ असा मोठा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा आणि हास्यास्पद असल्याचा संतापजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
काल दिवा-आगासन रोडवरील विकास आ. म्हात्रे गेट आणि आसपासच्या परिसरात ठाणे महापालिकेकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण’चे नवे कोरे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर अत्यंत ठळक अक्षरात “या परिसरात दररोज २ वेळा साफसफाई केली जाते.” असे लिहिण्यात आले आहे. प्रशासनाच्या या दाव्यानुसार, या परिसराची आठवड्यातून तब्बल १४ वेळा स्वच्छता होणे अपेक्षित आहे.
महापालिकेने लावलेले हे फलक पाहताच स्थानिक नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वास्तवात या ठिकाणी स्वच्छतेची वानवा असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
स्थानिकांनी उपस्थित केलेले प्रश्न:
- जर फलकावर लिहिल्याप्रमाणे दिवसातून दोन वेळा (आठवड्यातून १४ वेळा) सफाई होत असेल, तर तो कचरा जातो कुठे?
- नागरिकांच्या मते, दिवसातून दोन वेळा तर दूरच, पण आठवड्यातून साधी सात वेळा (म्हणजे दिवसातून एकदा) तरी या भागात नीट सफाई होते का हे तपासत जा. केवळ कागदोपत्री आणि फलकांवर स्वच्छता दाखवून प्रशासन नेमकी कोणाची दिशाभूल करत आहे? असा प्रश्न या विभागातील अनेक जागरूक नागरीकांनी यावेळी केला.
‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये शहराला चांगले मानांकन मिळावे आणि अधिकाऱ्यांची पाठ थोपटली जावी, यासाठीच हा सर्व खटाटोप सुरू असल्याची टीका आता होऊ लागली आहे. महापालिका लाखो रुपये खर्चून असे दिखाऊ फलक लावत आहे, पण जर प्रत्यक्ष रस्त्यांवर कचरा तसाच पडून राहणार असेल, तर या जाहिरातबाजीचा उपयोग काय? असा संतप्त सवाल दिव्यातील जनता विचारत आहे.
महापालिकेच्या संबंधित घनकचरा व्यवस्थापन विभागाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या केवळ फलकबाजीवर समाधान न मानता, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छतेची पाहणी करावी आणि नियमित साफसफाईची अंमलबजावणी करावी, अश्या जोरदार मागणीसह नागरिकांकडून दिशाभूल करणाऱ्या फलकाविरोधात संतापही व्यक्त केला जात आहे.
