बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली. महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली.
महायुतीच्या व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या नेत्या म्हणून सुप्रिया सुळे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
सांगता सभेला उपस्थित राहणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार त्या सभा सुरू झाल्यानंतर आल्या. जय पवार त्यांना व्यासपीठापर्यंत घेऊन आले. त्या येण्याआधीच व्यासपीठावर महाविकास आघाडीचे नेते हर्षवर्धन पाटील हजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचे भाषण सुरू असतानाच सुप्रिया सुळेंचे आगमन झाले. भुजबळांनी भाषण थांबवून त्यांचे स्वागत केले.
सुप्रिया सुळे व्यासपीठावर येताच उपस्थित बारामतीकरांनीही टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. सुप्रिया सुळेंनी हात जोडून बारामतीकरांना नमस्कार केला. यावेळी मंत्री धनंजय मुंडे हे हात जोडून उभे होते. त्यांच्याशेजारील मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही उभे राहून सुळे यांच्याकडे पाहत स्मितहास्य केले. सुप्रिया सुळे हात जोडूनच पुढे गेल्या.
व्यासपीठावर यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ हेही उपस्थित होते. त्यांच्यासमोरूनच सुप्रिया सुळे पुढे गेल्या. त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनाही भेटल्या. त्यांनी व्यासपीठावरील दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत आदरांजली वाहिली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या शेजारील खुर्चीवर त्या बसल्या.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात सुनेत्रा पवार यांच्यामागे महाविकास आघाडी खंभीरपणे उभी राहील, असे आश्वासन दिले. त्यानंतर काही वेळातच त्या सभेतून निघाल्या. यावेळी प्रफुल पटेल यांचे भाषण सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभास्थळी येण्याआधीच सुळे तिथून गेल्या. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते.
