देशात पुन्हा ‘लॉकडाऊन’ सारखी स्थिती; ६० जिल्ह्यांत हायअलर्ट…
दोन वर्षांपूर्वी देशाने कोरोनाचा भयावह काळ अनुभवला, रस्ते ओस पडले होते आणि लोक घराबाहेर पडायला घाबरत होते. आज तशीच काहीशी स्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. पण यावेळी समोर कोणताही ‘व्हायरस’ नाही, तर आकाशातून आग ओकणारा सूर्य आहे.
देशातील तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला असून, अनेक राज्यांमध्ये ‘सेल्फ लॉकडाऊन’ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विदर्भासह ५ राज्ये आगीच्या भट्टीत
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये ४५.२°C आणि महाराष्ट्रातील अकोल्यात ४५°C तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताचा मोठा भाग सध्या ‘हीट वेव’च्या कचाट्यात सापडला आहे. अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर यांसारखी शहरे अक्षरशः होरपळून निघत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे, जणू काही अघोषित संचारबंदीच लागू झाली आहे. उष्णतेची तीव्रता इतकी भयानक आहे की, राज्य सरकारांना आता कोरोना काळासारखेच कडक निर्णय घ्यावे लागत आहेत.
६० जिल्ह्यांत रेड अलर्ट
हवामान विभागाने उत्तर प्रदेशातील ६० जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. विशेष म्हणजे, आता केवळ दिवसच नाही तर रात्रीही धोकादायक ठरू लागल्या आहेत. हरियाणा, दिल्ली आणि यूपीमध्ये ‘वॉर्म नाईट’ (गरम रात्री) अनुभवता येत आहेत, ज्यामुळे शरीराला थंडावा मिळणे कठीण झाले आहे. कर्नाटकातील सर्व रुग्णालयांमध्ये ‘हीट स्ट्रोक युनिट्स’ तयार करण्याचे आदेश दिले आहेत, जे या संकटाचे गांभीर्य अधोरेखित करते.
केरळमध्ये ‘सेल्फ लॉकडाऊन’
केरळच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला सकाळी ११ ते ३ या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत ‘सेल्फ लॉकडाऊन’ पाळण्यास सांगितले आहे.
दुपारी कामावर बंदी
उत्तर प्रदेशातील आग्रा आणि मथुरासह अनेक जिल्ह्यांत दुपारी १२ ते ४ या वेळेत मजुरांच्या कामावर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. उष्णतेची सर्वाधिक तीव्रता उत्तर प्रदेशात जाणवत असून, राज्यातील ६० जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एरवी थंड असलेल्या हिमाचल प्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्येही हीटवेव्ह सुरू असून ऊना जिल्ह्याचा पारा ४१.१ अंशांवर पोहोचला आहे. मध्य प्रदेशातील ११ जिल्ह्यांतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाढत्या उष्णतेमुळे विविध राज्य सरकारांनी खबरदारीचे उपाय म्हणून कडक पावले उचलली आहेत. ओडिशामध्ये १८ शहरांत पारा ४० पार गेल्याने सोमवारपासून सर्व शाळा बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राची स्थिती काय?
विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ ही शहरे देशातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत आहेत. महाराष्ट्राच्या काही भागांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, २४ एप्रिल रोजी देशातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तीन शहरांचा समावेश आहे. त्यामुळे ११ ते ४ वाजेपर्यंत कामाशिवाय बाहेर जाऊ नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पुढील ४८ तासांचा अंदाज
२६ एप्रिल: दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात हीटवेव्हचा प्रभाव राहील. तर गुजरात, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये हवामान दमट आणि उष्ण असेल.
२७ एप्रिल: उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. बिहार ते महाराष्ट्र असा मोठा पट्टा हीटवेव्हच्या कचाट्यात असेल. हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात रात्रीचे तापमानही जास्त राहून ‘वॉर्म नाईट’ (गरम रात्री) अनुभवता येतील.
