छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
इतिहासाच्या चुकीच्या मांडणीवर त्यांनी आक्षेप घेत, महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून इतिहासाचे विकृतीकरण सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
वादग्रस्त वक्तव्यावर संताप
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला असून नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी त्यावर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची मांडणी केल्याचा आरोप करत भोसले यांनी संबंधित वक्तव्याचा निषेध केला. इतिहासाशी छेडछाड करणे हा गंभीर प्रकार असून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘महाराजांचे योगदान निर्विवाद’
भोसले यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी देव, देश आणि धर्मासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांच्या कार्यामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि देशाच्या स्वातंत्र्याची पायाभरणी घडली. अशा महान व्यक्तिमत्त्वाबद्दल चुकीची विधाने करणे अक्षम्य असून ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
एनसीईआरटी मुद्द्यावर ठाम भूमिका
एनसीईआरटीच्या संदर्भात सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना भोसले म्हणाले की, हा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जात आहे. मात्र, इतिहासाच्या अचूकतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. “शिवाजी महाराजांच्या पुण्याईमुळेच आज काही जणांना ओळख मिळाली आहे,” असा टोला लगावत त्यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.
संतांचा आदर, पण निषेध कायम
दरम्यान, भोसले यांनी संत-परंपरेबद्दल आदर व्यक्त करताना सांगितले की, समाजात साधू-संतांना नेहमीच मान दिला गेला आहे आणि पुढेही दिला जाईल. मात्र, त्या आडून वादग्रस्त किंवा चुकीची विधाने केली गेल्यास त्याचा निषेध करणे आवश्यक आहे. “आदर कायम राहील, पण चुकीच्या विधानांवर आवाज उठवणेही तितकेच गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
एनसीईआरटीची सुपारी
उत्तर भारतातून एनसीईआरटीची सुपारी घेतल्यासारख्या आविर्भावात महाराष्ट्रात येऊन भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे, अखंड हिंदुस्तानाचे दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान करणाऱ्या बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो, असे मुधोजी भोसले म्हणाले.
