‘झाडू’ मारून देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय राजकारणात उतरलेल्या ‘आम आदमी पक्षा’वर ‘भाजप’नेच झाडू चालविला आहे. राज्यसभेतील दहापैकी ७ खासदार भाजपमध्ये सामील झाल्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील गेल्या वर्षीच्या पराभवापाठोपाठ ‘आप’ला दुसरा जबर धक्का बसला आहे.
‘आप’ला खिंडार पाडल्यानंतर भाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’चा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या लोकसभेतील महाराष्ट्रातील पक्षांकडे तसेच राज्यसभेतील तृणमूल काँग्रेस आणि द्रमुककडे वळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षासह या पक्षांनीही 131 व्या घटनादुरूस्ती विधेयकाला विरोध केला होता
राज्यसभेतीलसर्वांत तरुण खासदार राघव चढ्ढा यांच्या पुढाकाराने दोन तृतीयांश खासदार भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना जबर धक्का बसला आहे. राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि स्वाती मालीवाल हे केजरीवाल यांचे सर्वांत विश्वासू मानले जात होते. पण संधी मिळताच साथ सोडल्यामुळे केजरीवाल यांच्या नेतृत्वावर तसेच त्यांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
क्रिकेटपटू हरभजनसिंह, अशोक मित्तल, राजेंद्र गुप्ता आणि विक्रमजीत साहनी ‘बाहेरून’ आलेले होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याबद्दल फारसे नवल वाटलेले नाही. केजरीवाल आणि ‘आप’वर नाराज असलेल्या स्वाती मालीवाल यांच्यापाठोपाठ राघव चढ्ढा यांची पावले भाजपच्या दिशेने चालली होती.
काही महिन्यांपासून दुरावा :
केंद्र सरकारचा कथित दबाव, प्रलोभन व केजरीवाल यांचा दुरावा यामुळे गेल्या दोन वर्षांपासून राघव चढ्ढा, स्वाती मालिवाल व हरभजनसिंग पक्षामध्ये अडगळीत गेले होते. त्यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका व्यक्त केली जात होती. राज्यसभेतील नेतेपद काढून घेतल्यानंतर चढ्ढाही अस्वस्थ होते, पण ‘आप’चे रणनीतीकार संदीप पाठक यांनीही केजरीवाल यांची साथ सोडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
राघव चढ्ढांना मंत्रिपद?
‘आप’ला खिंडार पाडल्याबद्दल राघव चढ्ढा यांना ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळात होणाऱ्या प्रस्तावित फेरबदलात मंत्रिपदाचे बक्षीस मिळू शकते. राज्यसभेत भाजपचे आधी १०६ खासदार होते. आथा ‘आप’ चे ७ खासदार विलीन झाल्यामुळे २४५ संख्याबळ असलेल्या राज्यसभेत भाजप-रालोआचे संख्याबळ आता दीडशेच्या वर जाणार आहे. तर एकट्या भाजपचे संख्याबळ ११३ झाले आहे.
