गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं विरोधकांचा सुपडासाफ केला आहे. नगर परिषद, नगरपालिकेपासून जिल्हा पंचायतीपर्यंतच्या निवडणुकांमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे.
पण याच निवडणुकीत काही आश्चर्यजनक निकालही लागले आहेत.
भारतीय पोलीस दलातील (आयपीएस) नोकरी सोडून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या मनोज निनामा यांचा पराभव झाला आहे. राज्यात भाजपची त्सुनामी असतानाही ते पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार राहिलेल्या भूपत भयाली यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मनोज निनामा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. निनामा गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी होते. राजकारणात येण्यासाठी त्यांनी आयपीएसची नोकरी सोडली. यानंतर भाजपनं त्यांना अरावलीतील शामलाजी तालुक्यातील ओध जिल्हा पंचायतीमधून तिकीट दिलं होतं.
मनोज निनामा यांना भाजपनं अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली होती. त्यामुळे राजकीय वातावरण बरंच तापलं होतं. निनामा यांनी जोरदार प्रचार केला. मात्र तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही. उत्तर गुजरातच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
आम आदमी पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले शेतकरी नेते राजू करपडा यांचाही पराभव झाला आहे. सुरेंद्र नगर जिल्ह्यातील मुली-२ मधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण त्यांचा पराभव झाला. २०२२ मध्ये आम आदमी पक्षाकडून भूपत भयाणी आमदार झाले होते. यानंतर त्यांनी पक्षांतर करत भाजपची वाट धरली. आमदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये गेले. भाजपकडून त्यांनी जिल्हा पंचायतीची निवडणूक लढवली. आपच्या उमेदवारानं भयाणी यांना पराभवाचा धक्का दिला.
गुजरात केडरचे माजी आयपीएस मनोज निनाम यांनी ४२ वर्षे पोलीस दलात सेवा दिली. त्यांनी भाजपकडून अरावली जिल्हा पंचायतीच्या शामलाजी तालुक्याच्या ओध जिल्हा पंचायतीची निवडणूक लढवली. मनोज निनामा ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. पण आपल्या गावातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. सत्ताधारी पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली. राज्यात भाजपची लाट असूनही त्यांचा पराभव झाला.
मनोज निनामा यांच्यावर माजी आयपीएस अधिकारी आणि त्यांचे जीवश्चकंठश्च मित्र पी. सी. बरंडा यांचा प्रभाव आहे. बरंडा यांनीही पोलीस विभागात प्रदिर्घकाळ सेवा दिली. त्यानंतर ते राजकारणात आले. अन्न आणि पुरवठा, ग्राहक मंत्रालयांचा कारभार त्यांनी पाहिला. ते अरावली जिल्ह्याच्या भिलोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. बरंडा यांच्याच पावलावर पाऊल टाकत निनामा यांनी राजकारणात प्रवेश केला. यानंतर भाजपचे सेजल गोहेल यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. गोहेल यांनीच निनामा यांना पराभवाचा धक्का दिला.
