गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची त्सुनामी दिसून आले आहे. या त्सुनामीमध्ये काँग्रेससह आम आदमी पक्ष भूईसपाट झाले आहे. राज्यातील सर्व १५ महापालिकांमध्ये भाजपने सत्ता काबीज करत विरोधकांना धूळ चारली आहे.गुजरात म्हणजे भाजपच हे समीकरण पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.विजयी वारू सर्वत्र उधळत असताना एका वॉर्डातील पराभवाची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे.
अहमदाबाद, सूरतसह राजकोटमध्येही भाजपने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. राजकोट महापालिकेतील ७२ पैकी तब्बल ६५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी चार उमेदवार हे जांगलेश्वर भागातील एका वॉर्डमधून निवडून आले आहेत. काँग्रेसच्या याच विजयाची आता चर्चा होत आहे.
नेमकं काय घडलं?
जांगलेश्वर हा भाग अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मागील निवडणुकीतही या भागातून भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले होते. मात्र, यावेळी पक्षाला दणका बसला. त्याला राजकोट महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात केलेली बुलडोझर कारवाई कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे.
महापालिकेने अतिक्रम कारवाईंतर्गत या भागातील तब्बल १ हजार ४८९ बांधकामे पाडली होती.त्यामध्ये घरांसोबतच दुकाने आणि धार्मिक स्थळांचाही समावेश होता. अनेक वर्षांपासून या भागात राहणाऱ्या नागरिकांची घरे पाडण्यात आल्याने प्रशासनाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने निवडणुकीत पेटवला. त्याचा फायदाही पक्षाला झाला.
काँग्रेस स्थानिकांचा आवाज उचलून धरत भाजपविरोधात रान उठविले होते. जांगलेश्वर या भागात दलितांसह मुस्लिमांचीही मते लक्षणीय आहेत. हे मतदार अनेक वर्षे भाजपला मतदान करत होते. पण यावेळी बुलडोझर कारवाई भोवली. मतदारांनी मतदानातून आपला राग व्यक्त केल्याची चर्चा आहे. सत्ताधारी पक्षासाठी आता हा एकप्रकारे धडा मानला जात आहे. त्यामुळे देशभरात या निकालाची चर्चा सुरू आहे. भाजपशासित अनेक राज्यांमध्ये बुलडोझर कारवाई केली जाते.
दरम्यान, भाजपने महापालिकांसोबतच जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेस आणि आपने निवडणुकीत कंबर कसली होती. पण त्यांना अपेक्षित यश मिळविता आले नाही. भाजपने आपले पारंपारिक गड शाबूत ठेवत विरोधकांना पळताभूई थोडी केली.
