भाजपच्या गोटातून एक मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यातील भाजपच्या माजी महिला जिल्हामंत्री यांनी जिल्हा अध्यक्ष मोहनलाल कुशवाहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे दावा केला की, जिल्हा उपाध्यक्ष पद देण्याच्या बदल्यात मोहनलाल कुशवाहा यांनी त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला.
माजी महिला जिल्हामंत्र्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी जिल्हा उपाध्यक्षपदासाठी मोहनलाल कुशवाहा यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवल्याशिवाय तुला हे पद मिळणार नाही. यासोबतच त्यांनी दिल्ली आणि लखनऊला सोबत येण्याचा प्रस्तावही ठेवला. महिला नेत्याने हा प्रस्ताव नाकारल्यावर जिल्हाध्यक्षांनी त्यांना पक्षातून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महिला नेत्याने आणखी गंभीर आरोप करताना म्हटले की, जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हा उपाध्यक्ष या दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील जिल्हाध्यक्षांच्या या मागणीला पाठिंबा देत तिच्यावर दबाव टाकला. नकार दिल्यानंतर माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले.
या घटनेमुळे त्या भावुक झाल्या आणि म्हणाल्या, “मी गेली अनेक वर्षे भाजपसोबत एकनिष्ठपणे काम करत होते. पण जेव्हा माझ्या नवऱ्याला खोट्या बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगवासाची धमकी देण्यात आली, तेव्हा माझा संयम संपला. त्यामुळे मला जनतेसमोर आपली व्यथा मांडावी लागली. या प्रकरणी महिला नेत्याने महोबा पोलिस अधीक्षक (SP) यांच्या कार्यालयात लिखित तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरही आपली बाजू मांडली असून, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, भाजपचे महोबा जिल्हाध्यक्ष मोहनलाल कुशवाहा यांनी सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, हे आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि पक्षात फूट पाडण्यासाठी काही लोकांकडून हा कट रचला जात आहे.नवीन जिल्हा कार्यकारी समितीच्या स्थापनेपासून महोबा भाजपमध्ये असंतोषाची लाट सुरू होती. आता या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाची तीव्र चर्चा सुरू असून, भाजप उच्च नेतृत्वाकडून यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
