विधान परिषदेसाठी ‘या’ दोघांना संधी देणार ?
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त शेवटचे दोनच दिवस शिल्लक असून अद्याप कोणीच उमेदवार जाहीर केलेला नाही.
त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या नंदनवन निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेसाठी कोणाला संधी देणार लागली आहे.
आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत पक्षातील नाराजी, पक्षातील नेत्यांची वक्तव्य याबाबत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यासोबतच या बैठकीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांच्या नावांबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. या बैठकीत संजय गायकवाड यांच्या वक्तव्यांबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता असून या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला पक्षाचे नेते, उपनेते, महत्वाचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. शिवसेनेची बैठक बुधवारी संध्याकाळी नंदनवन या निवासस्थानी होणार आहे. नंदनवन येथे होणाऱ्या बैठकीत विधान परिषद निवडणूक हा विषय केंद्रस्थानी असणार आहे.
विधान परिषदेसाठी ‘या’ दोन नावांची चर्चा
विधान परिषदेसाठी शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा येत आहेत. शिवसेनेकडे 57 आमदार असल्याने सेनेच्या दोन जागा निवडून येऊ शकतात. यामुळे उद्याच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात आणि कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावांची चर्चा सुरु होती. नीलम गोऱ्हे यांच्या नावाला विरोध करणारं पुण्यातील महिलाचे एक पत्र व्हायरल झाले होते. तर, बच्चू कडू यांना संधी द्यायची असल्यास त्यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचे शिवसेनेत (Shivsena) विलिनीकरण करुन घ्यावे, अशी भूमिका शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतली होती. त्यामुळे याबाबत शिंदे काय निर्णय घेणार यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड सातत्याने वेगवेगळ्या कारणांमुळे वादात आहेत. काही महिन्यांपूर्वी आमदार निवासामधील कॅन्टिनमधील कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याने ते वादात अडकले होते. तर, काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांनी कोल्हापूरमधील प्रशांत अंबी यांना फोन करुन वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे या सर्व प्रकरणांवर एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
