ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी,विकी जाधव
ठाणे/उल्हासनगर : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचारादरम्यान भगवान उत्तम लिंबोंरे यांचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर व प्रशासनाविरोधात गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणी गजानन लिंबोंरे यांनी शुक्रवारी (८ मे) भैय्यासाहेब आंबेडकर नगर, खेमानी, उल्हासनगर-२ येथे पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनाक्रम मांडला.
गजानन लिंबोंरे यांनी सांगितले की, ३ मे रोजी भगवान लिंबोंरे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, “तब्येत चांगली आहे” असे सांगून डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेतले नाही व घरी पाठवले. यानंतर ७ मे रोजी रात्री पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टर जवळपास २० मिनिटे आले नाहीत. नंतर रुग्णाला ग्लुकोज व इंजेक्शन देऊन “रुग्ण स्थिर आहे” असे सांगण्यात आले.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्रीनंतर अचानक रुग्णाची प्रकृती खालावली. पत्नी व मुलाने मदतीसाठी वारंवार हाक मारूनही संबंधित डॉक्टर जवळपास तासभर उपचारासाठी आले नाहीत. वेळेत उपचार न मिळाल्याने भगवान लिंबोंरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
यावेळी संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारला असता, “तुम्ही कितीही मोठ्या लोकांना बोलवा, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही,” अशी धमकीवजा वागणूक दिल्याचाही आरोप करण्यात आला. तसेच अधिकारी मनोहर बनसोडे हे दोषी डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी कुटुंबीयांनी दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनीही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

