प्रतिनिधी-नागेश पवार ठाणे: राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि आक्रमक नेते आनंद परांजपे यांनी आज आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिग्गज मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या उपस्थितीत आनंद परांजपे यांनी हाती भगवा झेंडा घेतला.
आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्याकडे आपले राजीनामा पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी पक्षाचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक या सर्व जबाबदाऱ्यांचा त्याग करत असल्याचे स्पष्ट केले आहे. आजवर पक्षाने दिलेल्या संधीबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत.
आनंद परांजपे हे ठाण्यातील एक अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर खासदार म्हणून काम केले आहे. त्यांच्या या ‘घरवापसी’मुळे ठाणे आणि परिसरात शिवसेनेची (शिंदे गट) पकड अधिक मजबूत झाली आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परांजपे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ताज्या बातम्या आणि राजकीय विश्लेषणासाठी आमच्या पोर्टलशी जोडलेले राहा.
