
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
पृथ्वीवर जीव निर्मिती झाली.नंतर उत्क्रांती होत पुढे मानव जातीची निर्मिती झाली. सुरवातीस माझी तूझी किंवा माझं तुझं ही संकल्पनाच नसेल. कोणी कोणत्याही गोष्टीवर वस्तूवर मालकी हक्क सांगत नसावे. काळाच्या ओघात मानव बुद्धीमान होत राहीला. मेंदूची वाढ झाली. हळूहळू भटकणारा मानव स्थिरस्थावर होत राहीला. समाजात शेतीची संकल्पना रुजली कदाचीत तेव्हा पासून माणुस तूझं माझं असं हक्क गाजवायला शिकला असेल.
समाजात कुटुम्ब ही संकल्पना प्रचलित झाली व पुढे माझं तुझं म्हणत स्वार्थी भावनेने जादाचं पेट घेतलीय असे वाटते. येथूनच मानव जातीत टोळ्या निर्माण झाल्या. वर्चस्व गाजविण्याची इर्षा निर्माण झाली. त्यातून मानुस एकमेंकास झूंज देवू लागली. हळूहळू झूंजीचं स्वरूप बदललं. कुटुम्ब, गल्ली, गाव तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्र अशा संकल्पनाचा विकास होत राहीलं. एक समूह दुसऱ्या समूहा पासून वेगळे कसे आहोत हे दाखविण्यासाठी धडपड सुरु झाली. जीवन जगण्याची प्रत्येकाची एक वहीवाट ठरविली गेली. व यथेच हळूहळू धर्म ही संकलनाचा उदय झाला असावा.
धर्म म्हणजे जीवन जगण्याची रित किंवा पद्धती आहे. समाजाची धारणा करतो तो धर्म. समाजाला योग्य रस्त्याने नेणारा तो धर्म. समाजात एकोपा ठेवणारा, वाईट कुकर्मापासून व्यक्तीस रोखणारा तो धर्म. एकमेकाला मदत करण्यास शिकवणारा समाजात एकी ठेवणारा तो धर्म; पण आज धर्माचा उपयोग कसा होतो आहे. खरे तर धर्म ही वैयक्तीक खाजगी बाब आहे. कोण कसं वागावं हे दुसरा कोणीही सांगू शकत नाही. ते स्वतः व्यक्ती ठरवत असतो.
कुठला ही धर्म वाईट गोष्टी करण्यासाठी सांगत नाही. समाजा समाजात फुट पाडत नाही. व्देष भावनेची पेरणी करत नाही. जगातील सर्व धर्मचा अंतिम उदेश आहे….. मानवाचं जीवन सुखी व्हावं सर्व मानव जात उन्नतीच्या मार्गावर चालावी. धार्मिकतेच्या बाबतीत आपल्या देशातील वातावरण बदलत आहे.
आपल्या भारत देशात तर आठरापगड जाती आहेत. अनेक धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहात आहेत. येथील थोर पुरुष महात्म्यांनी, संतानेही समतेची शिकवणूक दिलेली आहे. येथील सामन्य नागरिक प्रामाणिकपणे त्याचे पालन करताना दिसून येते.
माझ्या भारतात उच निच हा भाव नसावा. येथील जनता समता या तत्वाचा वापर करून जीवन उन्नत करावे. येथे विषमता नसावी. सर्वांनी अभिमानाने जगावे. गरीब श्रीमंत असा भेद नसावा. येथे लज्जेने कोणाचीही मान खाली जावू नये. येथे बंधूभावा जोपासला जावा. राजा आणि प्रजा सुखी रहावी. येथे जात, पात, धर्म, वंशभेद नसावं अशी शिकवण राज्य घटनेने आपणास दिलेली आहे. त्याचं पालन व्हावे.
सर्व धर्माची शिकवण मानवतेची आहे; पण आज धर्माचा उपयोग कसा होतोय ते आपण पहात आहोत. धर्मातच जेव्हा अनिष्ठ प्रथा शिरतात तेव्हा ते धर्म निश्चितच पतनाच्या मार्गाला लागतो. जेव्हा जेव्हा धर्मात काही अनिष्ठ बाबी आल्या त्या बाबी नष्ट करणासाठी काही थोर संत पुरुषांनी प्रयत्न केले. त्यात हिंदू धर्मातील गौतम बुद्ध(दहावा अवतार), महावीर वर्धमान, जगतगुरु बश्वेसर, गुरु गोविंदसिंघजी यांनी हिंदू धर्मातील अनिष्ठ रुढी, परंपरा, चाली रीती यांना विरोध करून समाजात समता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी लढा दिला. पण त्यांच्या अनुयानी त्यांच्या नविन धर्माची स्थापना केली. व पुढे त्यातही काही अनिष्ठ प्रथा सुरु झाल्या.
जेव्हा धर्म काळानुसार बदलत नसते तेव्हा तो धर्म समाजाची धारणा करू शकत नाही. प्रत्येक धर्मात असे बदल होतात. हिंदू धर्मातून बौद्धधर्म, जैनधर्म, शिखधर्म, विरशैवधर्म(नविन मागणी) धर्माची स्थापना झाली. वरिल धर्माचे निर्माते हे मुळ हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. पण जेव्हा सुधारणा झाली नाही तेव्हा त्यांच्या अनुयायानी नविन धर्माची स्थापना केली.
प्रत्येक धर्मात काही वाईट प्रवृतीच्या लोकांनी धर्माला बदनाम करण्याचा विडाच उचलेला असतो. त्यामुळे धर्मा धर्मातच फुट पडत जाते. हिंदू धर्मात तर जातीची उतरंड आहे. ही उतरंड फोडताना सध्या तरी कोणीही दिसत नाही. उलट ही उतरंड मजबूत कशी होईल, जातीयता मजबूत कशी होईल हे पहाण्यातच धर्मांधांना आनंद मिळत आहे. यामुळे भारतातील काही समाज हिंदू धर्मापासून दुरावण्याची भिती आहे. व तशी शक्यताही आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याची सुरुवात केलीय.
भारतातील मूळ आदिवासी समाज किंवा आदिम जाती ह्या हिंदू आहेत का? भारतातील ओबीसी समाज हा मूळ हिंदू आहे का? भारतातील आदिवासी समाज,भटका समाज व ओबीसी हा आजही प्रगती पासून, शिक्षणा पासून कोसो दूर आहे. त्यांना हिंदू धर्म ही कल्पनाच माहित नसावी कारण भटक्या विमुक्त, आदिवासी या लोकांची देवदेवता विषयी कल्पनाच भिन्न आहेत. हे लोक हिंदू धर्मपासून कित्येक वर्ष दूर होता. हा समाज प्रगत समाजापासून दूर आहे व होता. यांच्या धर्माचा कल्पना इतर धर्मापेक्षा वेगळ्या आहेत.
या भटक्या समाजत बंजारा, धनगर, वडर, कैकाडी, कोल्हाटी, गारुडी बहुरूपी असे कितेक समाज आहे ज्यांना हिंदू धर्म पूर्वी माहित ही नव्हता. तसेच खासी, गारो, नायर, गोंड, प्रधान या जातीनाही हिंदू म्हणजे काय हे माहित नाही. यांची संस्कृती, चालीरिती या वेगळ्या आहेत. मग यांचा हिंदू धर्मात समावेश कसा झाला? कोणी केलं? या विषयी संशोधन होणं आवश्यक आहे.
पूर्वी बंजारा व इतर आदिम समाज कधीही हिंदू देवदेवतांची पूजा करताना दिसत नाही. तो निसर्ग पूजक होता. उदा. बंजारा लग्न लावण्यासाठी कधीही ब्राम्हण किंवा जंगम येत नव्हते. त्यांना बोलवत नव्हते. लग्न लावण्याची प्रक्रिया समाजातील जाधव (गोरमाटी) पूर्ण करत असत.
मग बंजारा व इतर भटका समाज हिंदू धर्मात कधी पासून गेला? मला वाटते जेव्हा भारतात प्रथम जनगणना झाली तेव्हा जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यानी त्यांना हिंदू धर्मात टाकले असावे. या भटक्यांना पूर्वी मराठी, हिंदी निट बोलता येत नव्हती. यांचा अधुनिक जगाशी संपर्क ही नव्हता. ते सर्व निरक्षर होते. त्यांना काला अक्षर भैंस बराबर होता. त्यांना हिंदू धर्म काय असते हे माहित नव्हते ते स्वतः समोर हिंदू लावणे शक्य नव्हते असे मला वाटते.
आता भारतातील आदिम भटक्या जातीना हिंदू म्हणवता तर त्यांना माणूस म्हणून वागवा. प्रगत समाजाच्या बरोबरीने त्यांना आणा. हिंदू धर्मातील उच निच जातीभेद मिटवा हिंदू धर्मात भेदाभेद नाही हे जाहिर करा. नाही तर हा ही समाज एके दिवशी हिंदू समाजापासून दूर जाईल. जसं डॉ. बाबसाहेब व त्यांचा समाजनी केलं तसं होईल.
आज राष्ट्रवादावर भरपूर गप्पा छाटताना दिसून येते. राष्ट्रवादावर ज्यास्त भर दिसून येतो; पण राष्ट्रवादात अनंत आडचणी आहेत. येथे जातीची उतरंड आहे. येथे धार्मिकतेने पेट घेतलेला आहे. येथे विषमतेने छळ मांडलेला आहे. येथे पूर्वी घरात पाळाला जाणारा धर्म रस्त्यावर आलेला आहे. मी किती कट्टर धार्मिक आहे हे दाखविण्याचा सगळीकडे सर्व स्तरावर प्रयत्न होताना दिसत आहे. येथे सामान्य मानसाच्या भावनेशी खेळ खेळला जातो आहे. त्यांच्या भावनांचा बाजार येथे भरवला जातो आहे. कधी नाही तेवढी धार्मिक तेढ येथे निर्माण झालेली आहे.
आपल्याला कोणाच्याही धार्मिक भावना दुखवयाचा नाहीत. प्रत्येकला वैयक्तीक पातळीवर धर्मानुसार वागण्याचा हक्क आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे. भारत हा एक निधर्मी राज्य आहे. यांचा अर्थ येथील सर्व लोक निधर्मी आहेत असे नाही. तर येथील घटनेनुसार स्थापन झालेले सरकार हे निधर्मी असेल. सत्ताधारी म्हणून ते सत्तेत सहभागी असताना कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम भाग घेणार नाहीत. तसा कार्यक्रम ते आयोजित करणार नाहीत. सरकार म्हणून कोणाची धार्मिक भावना दुखावणार नाहीत. सर्व धर्म समभावाचे ते पालन करतील. सरकार हे धर्मातित असेल. पण आलीकडे सर्वच पक्षांच्या लोकांनी धार्मिक भावनाना हात घालत आहे. धर्माला रस्त्यावर उभे केलेलं आहे.
कोणे एकेकाळी आपल्या देशात भोंगा नव्हता तेव्हा आपले हिंदू देवदेवता व मुस्लीमचा अल्ला आपल्यावर रागावले होते का? पूजा अर्चा घरात करा. मंदिर मस्जीद मध्ये करा. रस्यावर नमाज पडणे व आरती म्हणने म्हणजे धर्म टिकवणे आहे का? देव व अल्लाला प्रसन्न करण्याचा हा मार्ग आहे का? याचा अर्थ एवढाच की भारतातील सामन्य नागरिक व त्यांच्या मुलांना त्यांच्या धार्मिक भावनेला दुखाच्या गर्ततेत ढकलणे असाच याचा अर्थ आहे. बोलणारे बोलून जातात. आग लावणारे आग लावून जातात पण यात होरपळ होते ते सामन्य तरुणांची जे नेत्यांच्या बोलण्याला भुलतात. क्षणभर ते कोण आहेत ते विसरतात व जन्मभर गुन्हेगारांच्या कठडीत व कोठडीत जीवन व्यतीत करतात. तरुणांनो लक्षात ठेवा नेत्यांची मुलं नातेवाईक हे फक्त दुरून तुमची हाल अपेष्टा पाहात सुखाने हसत असतात आनंद लूटत असतात.
आपणास राष्ट्रवाद जपयाचं असले तर जातीची उतरंड फोडली पाहिजे. एकमेकांच्या धार्मिक भावनेचा आदर केला पाहिजे. प्रादेशिक वाद सोडलेले पाहिजे. सर्वांना सोबत घेतले पाहिजे. सबका साथ सबका विकास करण्यासाठी सर्वांनी झटले पाहिजे. येथे राम नाम जपना पराया माल आपणा असं होता कामा नये. केवळ घोषणाबाजी नकोय. निवडणूकीत दिलेल्या वचनाची पूर्तता झाली पाहिजे. घटनेने सांगितेल्या सर्व गोष्टीची आमलबजावणी करून घटनेचे तत्व सगळ्या राजकारण्यांनी पाळले पाहिजे.
सामान्य हिंदू बोलतोय मुस्लीम विषयी ते चांगलचं असते. व सामान्य मुस्लीम बोलतय हिंदू विषयी ते पण चांगलचं असतय; पण असं न बोलणारे फारच कमी आहेत. हिंदू मुस्लीम मध्ये जर धार्मिक कट्टरपणा आला तर भारताचं भविष्य कसं असेल? पुढे येणाऱ्या पिढीला सुखासामाधानाने जगू द्यायचं असेल तर सर्वधर्म समभावाचा आदर केलाच पाहिजे. यासाठी भविष्यातील प्रत्येक भारतीय नागरिकांना राज्यघटना शिकवलीच पाहिजे. शाळेच्या व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात घटनेचा समावेश केला पाहिजे. धर्माच्या अभ्यासापेक्षा घटनेचा अभ्यासात समावेश व्हावा.
हिंदूच्या दररोजच्या बोलण्यात ‘हे अला तो अला’ (म्हणजे अल्ला) हा शब्द येतो. यापुढे आपण ते शब्द वापरणार नाही का? कारण अल्ला तर मुस्लीमचा देव आहे. मग प्रत्येकवेळी आला तरी गेला व गेला तरी गेला असं आपण बोलू शकत नाही. तर मुसलमान ही ‘ये देव ओ देव’ असे म्हणतात. देव आल्यामुळे त्यांनीही ते वाक्य बोलणार नाहीत का?
मानव जात एकमेकांवर अवलंबून होती. अवलंबून आहे व अवलंबून राहणार आहे. आपण कोणत्याही धर्माचे असू पण आपण प्रथम भारतीय आहोत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलाला भारतीय घटनेतून सांगितलेले आहे. तसा मंत्र दिलेला आहे.
धर्म कोणताही असु द्या. तुमची जात कोणतीही असु द्या पण आपण अधुनिक युगात जिवन जगत आहोत. आत सर्व जगच एकत्र येवू पहातो आहे. भारत एक सुपर पावर म्हणून जगासमोर येत आहे. अशावेळी आपण स्वतःच्या धार्मिक भावना आपल्या घरात ठेवू. जातीयतेचे समूळ उच्चाटन करू हे करणं मागासलेल्या लोकांच्या हातात नाही. हे करावे लागेल जे स्वतःला उच्च वर्णीय हिंदू समजतात त्यांना. आपण सामान्य लोक आपल्या भावना आपण आपला घरात ठेवू या. मंदिर मस्जीद मध्ये ठेवू या; पण रस्त्यावर आणणार नाही असे ठामपणे ठरवू या व भारताला एक बलशाली राष्ट्र बनवू या.
©राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड-४३१६०६
९९२२६५२४०७