
पटोलेंच्या नेतृत्वात मोठी जबाबदारी सांभाळलेल्या नेत्यानंच डागली तोफ !
फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेणारा काँग्रेस पक्ष फक्त एका जातीचा पक्ष झाला आहे. या पक्षात ओबीसींना दुय्यम स्थान दिले जाते. माझे म्हणणे खरे वाटत नसेल तर लोकसभा आणि विधानसभेचे उमेदवार बघा.
प्रदेश कार्यकारिणीवर नजर टाका. सर्व काही कळून येईल. अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्यानं पक्षाच्या ध्येयधोरणांवर हल्लाबोल केला आहे.
याच कारणामुळे काँग्रेस आता पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. सातत्याने ओबीसीवर अन्यायच केला जाणार असेल तर अशा पक्षात कशाला राहायचं, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी प्रदेश संघटन सरचिटणीस आणि नाना पटोले (Nana Patole) प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेस प्रशासनाची जबाबदारी सांभाळणारे देवानंद पवार यांनी तोफ डागली.
काँग्रेस नेते देवानंद पवार यांनी शुक्रवारी (ता.27) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपवर जातीवादी पक्षाचा शिक्का आहे. मात्र, याच पक्षानं मंत्रिमंडळात सर्वाधिक बहुजनांना स्थान दिले आहे. मला काय देईल नाही देईल. यासाठी मी भाजप पक्षात प्रवेश केला नाही. मात्र, माझ्या बहुजनांना न्याय दिला जात असले तर त्यांना साथ देणे माझे काम आहे. एवढी वर्षे काँग्रेसमध्ये वाया घालवली. ती सत्कारणी लावण्याचा प्रयत्न राहील.
राहुल गांधी यांनी सामाजिक न्याय यात्रा काढली. ते सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, महाराष्ट्रात त्यांच्या मतांच्या विरोधात सर्व काही सुरू आहे. सामाजिक न्याय बोलण्याचा नव्हे तर देण्याचा विषय आहे. काँग्रेसनं (Congress) पन्नास वर्षांपासून बहुजन विचारधारा दाबून टाकली आहे. फक्त विशिष्ट जातीलाच मोठे केले जात आहे. त्यांनाच सर्व पदे दिली जातात.कोणी विरोधात आवाज उचलला सर्व एकजूट होतात. त्यालाच संपवतात. नाना पटोले यांचे नेतृत्वही त्यांना खटकत होते,असा आरोपही काँग्रेस नेते देवानंद पवार यांनी केला.
लोकसभेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात लढली. मोठा विजय महाराष्ट्रात काँग्रेसने मिळवला. याच कारणामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले. आपली मक्तेदारी कायम राहावी याचेच प्रयत्न सातत्याने काँग्रेसमध्ये केले जातात. दोन ते अडीच वर्ष काँग्रेसच्या मुख्यालयात होते. त्यामुळे हे अधिक ठळकपणे जाणवले, बघता आले.
देवानंद पवार यांनी लोकसभेच्या आणि विधानसभेचे तिकीट वाटपात बहुजनांना पराभूत होण्याची दाट शक्यता अशा जागा देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच मुस्लिम आणि एससी, एसएसटींना जागा सोडाव्याच लागतात, म्हणून त्या देण्यात आल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला.
याच कारणामुळे ओबीसी व बहुजन समाज काँग्रेसपासून दुरावत चालला आहे. हा पक्ष आता पराभूतांचा पक्ष झाला आहे. जे कधी निवडून येत नाही, वारंवार पराभूत होतात त्यांनाच पक्षातर्फे तिकीट दिले जाते. प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिले जाते अशीही तोफ देवानंद पवार यांनी डागली.