शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे पुढील दोन महिने म्हणजेच डिसेंबरपर्यंत ते राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही गोष्टींपासून लांब राहणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबरला केली होती.
त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला होता की, संजय राऊत लवकरच मैदानात दिसतील. नुसते मैदानात दिसणार नाहीत, तर तलवार घेऊन मैदानात दिसतील. त्यानुसार आता संजय राऊत यांनी पुन्हा एकत्र पत्रकार परिषद घेत विरोधकांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे.
आजारपणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उपचार अद्याप सुरू आहेत आणि माझी तब्येत सुधारत आहे. तब्येत पूर्ण सुधारायला अजून थोडा वेळ लागेल. एक महिन्यापेक्षा जास्त काळ घरच्या आणि रुग्णालयाच्या कैद खान्यात आहे. उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे. मी कुठे बाहेर पडतो का? आताही माझ्या पत्रकार परिषदेला त्यांची परवानगी नाही. कारण उपचार फार कठोर असतात. आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. पण ते चालू आहेत आणि मी जसं म्हटल्याप्रमाणे डिसेंबरनंतर मी पूर्ण बरा होऊ येईल. त्यानुसार मी आलो आहे, असे त्यांनी म्हटले.
तुमच्या आजारपणावर डॉक्टरांचं काय म्हणणं आहे. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, डॉक्टरांची आमची जी टीम आहे, त्यात मुंबईतले प्रमुख डॉक्टर आहे. ते माझ्यावर उपचार करत आहेत आणि रेडिएशनचा जो मुख्य भाग आहे, तो संपलेला आहे. इतर काही उपचार सुरू आहेत. रिकवरी चांगल्या प्रकारे सुरू आहे, पण माझ्यासारखा माणूस स्वस्त बसू शकत नाही. जर बरा असतो, नगरपालिका निवडणुकींच्या प्रचारामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो असते. नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलं आहे की, आज लक्ष्मी दर्शन होणार आहे. त्यामुळे आता कुठे-कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे, याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं होतं की, 1 डिसेंबर रोजी सकाळी होणार आहे. त्यामुळे लोक आज सकाळपासून जागेच आहेत. मला जी माहिती की, लोक सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी 10 हजार, 15 हजार मतामागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
