मनसेचा सर्वात मोठा नेता थेट भाजपच्या गोटात; राजकीय वर्तुळात खळबळ !
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे यांच्यात संभाव्य युती आणि जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच मनसेला एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
या पक्षांतरामुळे कल्याण-डोंबिवलीच्या आगामी राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकाश भोईर यांचा हा पक्षप्रवेश डोंबिवलीतील गावदेवी मंदिर परिसरातील उमेश नगर मैदानात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. या पक्षप्रवेशासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. या नेत्यांसाठी मोठे स्टेज आणि कार्यकर्त्यांसाठी आसनव्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. विशेष म्हणजे, नुकतंच ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्यात कल्याण-डोंबिवलीतील संभाव्य जागा वाटपाबद्दल चर्चा झाली होती. या चर्चेपूर्वीच भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेला भाजपने मोठा राजकीय झटका दिल्याचे मानले जात आहे.
त्या ठिकाणी कार्यकर्ते पुढे कसं चालणार?
यावेळी, प्रकाश भोईर यांच्यासोबत डोंबिवली पश्चिमचे मनसे माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी प्रकाश भोईर यांनी आज या ठिकाणी मी पक्षप्रवेश झाला हे जाहीरपणे सांगतो. या उद्यानाचे उद्घाटन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व्हावे, ही माझी इच्छा होती. आम्हाला खूप निधी दादांनी रवींद्र चव्हाण यांनी दिला. इथले लोकं दादांवर खूप प्रेम करतात. 2010 मध्ये राजकारणातून बाहेर पडण्याची वेळ आली होती, मात्र प्रभागातील नागरिकांनी निर्णय घेऊन मला निवडणुकीत उभे केले. मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षात मला खूप प्रेम मिळाले, मात्र ज्या पक्षात कार्यकर्ते नाहीत, कार्यकर्त्यांनी खांदे टाकले, त्या ठिकाणी कार्यकर्ते पुढे कसं चालणार? असा सवाल प्रकाश भोईर यांनी केला.
मनसेच्या संभाव्य युतीला सुरुंग
प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही कार्यकर्त्यांसोबत जोडलेले असतात. राजकारणात नाही, तर राजकारणाच्या बाहेर जाऊन काम करणारी ही प्रतिनिधी आज भाजपमध्ये आले. गेल्या काही दिवसांत जेव्हा कल्याण-डोंबिवलीमध्ये येणाऱ्या काळात जे ग्रहण आहे, ते दूर करायचे असेल, तर तुमच्या सर्वांना भाजपला आशीर्वाद द्यावा लागेल. मला या कल्याण-डोंबिवली शहराचा महापौर का व्हावे लागेल, हे सांगितले होते. यासाठी जे माझे मित्र आहेत, ते सोबत येतील. विरोधकांना त्रास होत असेल, याचा, पण माझे सर्व मित्रच सोबत येत आहेत. प्रकाश भोईर येतात पाहून तो माझा दुसरा मित्र सुदेश चुडनाईक पण म्हणाला, ते येत आहेत, तर मी पण प्रवेश करतो. हा प्रवेश भाजपची ताकद वाढवणारा आणि आगामी पालिका तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेच्या संभाव्य युतीला सुरुंग लावणारा मानला जात आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.
