टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलोन मस्क यांनी अमेरिकेच्या प्रगतीमध्ये भारतीय कुशल मनुष्यबळाची मोठी भूमिका असल्याचे मान्य करत भारतीय प्रतिभेचे कौतुक केले आहे.
झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांच्या पॉडकास्टच्या नवीन भागात मस्क सहभागी झाले होते, याच संवादादरम्यान त्यांनी भारतातून स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि व्यावसायिकांनी अमेरिकेला दिलेल्या योगदानाबाबत सविस्तर भाष्य केले. अमेरिकेला प्रतिभावान भारतीयांमुळे खूप फायदा झाला आहे, असे थेट सांगत त्यांनी म्हटले की, तंत्रज्ञान क्षेत्रात आज पाहायला मिळणारी मोठी झेप भारतीयांनी अधिक सक्षम केली आहे
मस्क यांच्या मते, अमेरिकेने नेहमीच जागतिक स्तरावरच्या उत्कृष्ट बुद्धिमत्तेला आकर्षित केले आणि त्या प्रक्रियेत भारतातील मोठ्या संख्येने तरुण देशाबाहेर गेले. ज्याला भारतात ब्रेन ड्रेन म्हणून पाहिले जाते. तरीही मस्क यांनी स्पष्ट केले की अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानांवर भारतीय काम करत आहेत आणि ती एक सकारात्मक घडामोड आहे. परदेशी कामगार स्थानिक नोकऱ्या हिरावून घेतात या मताला त्यांनी विरोध दर्शवला. “प्रतिभावान लोकांची नेहमीच कमतरता असते. विशेषत: अत्यंत जटिल आणि भविष्यनिर्माण करणाऱ्या प्रकल्पांमध्ये अधिक कुशल आणि अनुभवी लोकांची गरज असते,” असे सांगत त्यांनी अमेरिकन रोजगारावर परदेशी कामगारांचा धोका अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे स्पष्ट केले. टेस्ला, स्पेसएक्स, एक्स आणि xAI या त्यांच्या कंपन्यांमध्ये नेहमीच उच्च क्षमतेचे कर्मचारी शोधले जातात आणि त्यांना सरासरीपेक्षा जास्त मोबदला दिला जातो, असेही त्यांनी नमूद केले.
एच-1बी व्हिसा धोरणावर बोलताना मस्क यांनी सांगितले की या व्यवस्थेचा काही कंपन्यांकडून गैरवापर होत असल्याने नियम कडक करण्याची मागणी वाढली आहे, मात्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. आपण एच-1बी कार्यक्रम थांबवावा या मताशी मी सहमत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगत अमेरिकी कामगार बाजारात जागतिक प्रतिभेसाठी स्थान कायम राहावे हे मत व्यक्त केले. भारतीय अभियंते, संशोधक आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांनी अमेरिकन उद्योग आणि नवकल्पनांमध्ये उभारलेला प्रभाव पुन्हा अधोरेखित करत मस्क यांनी जागतिक मनुष्यबळ संकल्पना तंत्रज्ञानाच्या भविस्यासाठी महत्त्वाची असल्याचा संदेश दिला.
