
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- आ.दि.पाटणकर
ता.भोर, पुणे :- समाज्याच्या आणि संपुर्ण राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे कार्य करणाऱ्या तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या महापुरुषांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन भोर तालुक्यातील वडतुंबी या गावातील सिध्दार्थ युवा प्रतिष्ठानकडुन बुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी करण्यात आले होते.
संपुर्ण दिवसभर चाललेल्या या सोहळ्याची सुरुवात शिवाजी कांबळे यांचे हस्ते ध्वजारोहण आणि सोपान कांबळे यांच्या बुद्धवंदनेने झाली.यावेळी सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी संपूर्ण गावातून महापुरुषांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत आंबेडकर नगरसह सर्व गावकरी लहानथोरांसह सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी भोर तालुक्यातील प्रामुख्याने आंबेडकरी चळवळीतील नेते उपस्थित होते त्यामध्ये दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके प्रतिष्ठान चे अध्यक्ष कश्यपदादा साळुंके, दिक्षाभूमी समितीचे सदस्य एस.टी. माने, भिम आर्मीचे अध्यक्ष महेंद्र साळुंके, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भोर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सतीश अडसूळ, वंचित बहुजन आघाडी पुणे महासचिव सतीश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस चे अविनाश गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरीष्ठ अधिकारी विद्याधर कांबळे, रायरेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळेकर, पत्रकार रुपेश जाधव उपस्थित होते तसेच उत्कृष्ठ मार्गदर्शक वक्ते सचिन शिवाजीराव खोपडे (नाझरे)यांनी भारतीय संस्कृतीची पुरोगामी विचारधारा या विषयावर सुंदर मार्गदर्शन केले.
या सोहळ्यामध्ये सचिन कांबळे यांचे तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामधील विजेत्यांना सरपंच छगन कांबळे आणि सिद्धार्थ युवा प्रतिष्ठान चे मुख्य सल्लागार सुरेश कांबळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
हा जयंती सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल शाक्य , उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, सचिव चेतन कांबळे यांचेसह सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.