
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
उत्कृष्ट अध्ययन प्रक्रियेसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उपयुक्त ठरेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
——————————————-
अमरावती :- अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे.त्यादृष्टीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’, तसेच ‘डेटा सेंटर’ उपयुक्त ठरेल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागात ‘इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्ज’ व उपकरणीकरण विभागात ‘इन्स्ट्रुमेंटेशन ऑटोमेशन अँड कंट्रोल’ ही दोन केंद्रे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून स्थापित करण्यात आली आहेत,तसेच ‘डेटा सेंटर’चेही नुतनीकरण करण्यात आले आहे.या केंद्रांचा शुभारंभ उच्च तथा तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला.शिक्षण सहसंचालक डॉ.व्ही.आर.मानकर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आशिष महल्ले आदी यावेळी उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’,तसेच ‘डेटा सेंटर’ अधिकाधिक उत्कृष्ट होण्यासाठी राज्यातील इतर संस्थांतील बाबींचा अभ्यास करून त्याचा समावेश करावा.तंत्रशिक्षण समाजाभिमुख व उपयुक्त करण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.यावेळी मंत्री उदय सामंत यांनी अध्यापक,कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा उपयोग अध्यापक विकास कार्यक्रम,प्रमाणपत्र कार्यक्रम,पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम,संशोधनाचे कार्य करू इच्छिणारे विद्यार्थी तसेच स्थानिक औद्योगिक प्रकल्पांना सेवा देण्यासाठी होईल असे प्राचार्य डॉ.महल्ले यांनी सांगितले.कोविड काळात ‘डेटा सेंटर’चा ग्रामीण विद्यार्थ्यांना अध्यापनात झालेल्या उपयोगाबाबतही त्यांनी माहिती दिली.अणुविद्युत अभियांत्रिकी शाखेचे सहायक प्राध्यापक डॉ.एस.एस.ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.