
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनी साधला लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद
——————————————-
जिल्ह्यातील ३५० लाभार्थी नियोजन भवनात उपस्थित
——————————————-
तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा यशस्वी
——————————————-
विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचा पुढाकार
——————————————-
अमरावती :- केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबवून या योजनांची प्रसिध्दी करुन लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात येतो.तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा यशस्वीपणे कार्य करीत आहे.याचीच परिणती म्हणून लाभार्थी परिसंवाद कार्यक्रमात लाभार्थ्यांनी शासकीय योजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी जिल्ह्यातील ३५० लाभार्थी उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनामार्फत देशभरात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.या धर्तीवर केंद्र व राज्य शासनाने लाभार्थ्यांसोबत परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता.यामध्ये प्रथम सत्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यभरातील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी सह्याद्री अतिथीगृहातून ऑनलाईन संवाद साधला.यावेळी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करुन शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अमरावती नियोजन भवन येथील सभा कक्षामध्ये जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी विविध योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्यासपीठावर आमदार रवी राणा,प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा,हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य,निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल,उपजिल्हाधिकारी मनिष गायकवाड,मनपा उपायुक्त डॉ.सीमा नेताम,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी,महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रिती देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.राज्याची प्रशासकीय यंत्रणा तालुका आणि गावपातळीवर काम करीत आहे. गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळावा,हे शासनाचे ध्येय आहे.लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आम्हाला अधिक जोमाने काम करायला प्रेरणा देते.याशिवाय जेथे जेथे उणिवा राहिल्या असतील त्याही दूर करण्यात येतील,असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
तर दुसऱ्या सत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे हिमाचल प्रदेशातील सिमला येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाव्दारे राज्य,जिल्हास्तरावर स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसह विविध योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी प्रधानमंत्री किसान योजनेतील २१ हजार कोटी रुपयांचा ११ वा हप्ता डिजिटली शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला.त्यानंतर त्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोगत जाणून घेतले.
या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी,प्रधानमंत्री उज्ज्वला योजना,पोषण अभियान,प्रधानमंत्री मातृवंदना योजना,स्वच्छ भारत अभियान,जलजीवन मिशन,प्रधानमंत्री स्वनिधी योजना,एक राष्ट्र एक राशनकार्ड,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना,आयुष्मान भारत योजना,आरोग्य योजना,प्रधानमंत्री मुद्रा योजनेसोबतच राज्य शासनाच्या कृषी,सिंचन,आरोग्य व वैयक्तिक लाभाचे लाभार्थी यावेळी उपस्थित होते.यावेळी रुख्मिणी पर्वतकर,मेघा गुडधे,सुवर्णा तायडे,अश्विनी वासनिक,कल्याणी गुडधे,सरोज रघुवंशी,ज्ञानेश्वरी सातव,प्रतिक्षा केवतकर,आरती नांदेडकर आदी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन नगरपालिका प्रशासनाचे प्रकल्प अधिकारी प्रवीण येवतीकर यांनी तर आभार तहसिलदार उमेश खोडके यांनी मानले.जिल्ह्यातील तहसिलदार,गटविकास अधिकारी,जिल्हा प्रशासनाचे अधिकारी,सरपंच,उपसरपंच यावेळी उपस्थित होते.