
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (IIT) संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थी कलश गुप्ता याने जगातील सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा जिंकली आहे.
त्याला TCS CodeVita, सीझन १० या जागतिक कोडिंग स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले आहे. या स्पर्धेत ८७ देशांतील सुमारे १ लाख स्पर्धकांचा सहभाग होता, अशी माहिती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने दिली आहे.
जगातील सर्वात मोठी संगणक प्रोग्रामिंग स्पर्धा म्हणून CodeVita ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. कलश गुप्ता या स्पर्धेचा विजेता ठरला असून प्रथम आणि द्वितीय उपविजेते अनुक्रमे चिली आणि तैवानचे स्पर्धक आहेत. या यशानंतर कलशचा आयआयटी दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी यांनी गौरव केला आहे.
जेव्हा मी स्पर्धेसाठी सुरुवात केली, तेव्हा मला कधीच वाटले नव्हते की मी टॉप ३ मध्ये असेन. पण हा खूप भावनिक अनुभव होता. मी या स्पर्धेतील बक्षीस रकमेबद्दल खूप उत्साहित आहे. सुरुवातीला माझ्याकडे आत्मविश्वास नव्हता. कारण पहिल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ द्यावा लागला. पण जसजसा पुढे गेलो आणि कोडिंग संदर्भातील इतर काही अडचणी सोडवल्या. तसतसा माझा आत्मविश्वास वाढला आणि मला खात्री झाली की मी पहिल्या टॉप ३ मध्ये येईन,” अशी भावना कलश गुप्ता याने व्यक्त केली आहे.
CodeVita ही स्पर्धा एक खेळ म्हणून प्रोग्रामिंगला प्रोत्साहन देते आणि त्यात सहभागी होणाऱ्यांना त्यांची कौशल्ये एकमेकांच्या विरोधात ठेवण्यासाठी आणि वास्तविक जीवनातील मनोरंजक आव्हाने सोडवण्यासाठी प्रोत्साहित करते.