
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -राहुल रोडे
निलंगा :- पुणे, काव्यमित्र संस्थेच्या वतीने दरवर्षी पुणे येथे दिला जाणारा राष्ट्रीय रुग्णसेवा पुरस्कार, राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार, राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार समतेच्या कविताची मेजवानी असे पुरस्कार विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित कार्यकर्तृत्व असलेल्या व्यक्तींना देऊन त्यांचा गौरव केला जातो. डॉक्टर्स डे, स्वामी विवेकानंद व महामहीम राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून दि. १० जुलै रोजी पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ पुणे येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावर्षीचा हा मानाचा पुरस्कार लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तगरखेडा या ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक, निवेदक, वक्ता व प्रवचनकार- जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश संघटक शिवश्री सतीश निवृत्ती हानेगावे यांना घोषित झाला आहे. याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.