
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दुबईत पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. त्याने आपले संपूर्ण आशिया चषक २०२५ चे मानधन भारतीय लष्कराला दान करण्याची घोषणा केली.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाला, “या संपूर्ण स्पर्धेतील माझे संपूर्ण मानधन मला वैयक्तिकरित्या भारतीय लष्कराला द्यायचे आहे.
मात्र, या विजयावर बक्षीस वितरण सोहळ्यातील विलक्षण दृश्यांमुळे सावट आले. या सोहळ्यात भारताने पाकिस्तानचे गृहमंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास नकार दिला. रविवारी कट्टर प्रतिस्पर्धकांवर भारताने मिळवलेल्या थरारक विजयानंतर जोरदार नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेरीस भारताने ट्रॉफीशिवायच आपला आनंद साजरा केला. वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केल्यानंतर, बराच विलंब झाल्यावर समारंभ सुरू झाला. भारताने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतरही नक्वी व्यासपीठावरच राहिले आणि ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली नाही. अमिरात क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरूनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्याची भारताची तयारी होती, जे व्यासपीठावर उपस्थित होते, पण नक्वी यांनी त्याला परवानगी दिली नाही.
माध्यमांशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, ” या स्पर्धेतील माझी मॅच फी मी आपल्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे तो म्हणाला की, मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून, मी क्रिकेटचे अनुसरण करायला सुरुवात केल्यापासून, मी अशी गोष्ट कधीही पाहिली नाही की एका विजेत्या संघाला ट्रॉफी नाकारली जात आहे. आणि तीदेखील कष्टाने मिळवलेली, ती आम्हाला सहज मिळाली असे नाही. ही कष्टाने जिंकलेली स्पर्धा होती. आम्ही ४ तारखेपासून इथे आहोत, सलग दोन चांगले सामने खेळलो. मला वाटते की आम्ही या ट्रॉफीसाठी पात्र होतो. मी याबद्दल अधिक काही बोलू शकत नाही, मला वाटते मी हे चांगल्याप्रकारे स्पष्ट केले आहे, मी याबद्दल यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही.
तो पुढे म्हणाला, “जर तुम्ही मला ट्रॉफींबद्दल विचाराल, तर माझ्या ट्रॉफी ड्रेसिंग रूममध्ये आहेत, ते सर्व १४ खेळाडू, सर्व सपोर्ट स्टाफ तेच खरे ट्रॉफी आहेत जे या आशिया चषकाच्या संपूर्ण प्रवासात सोबत राहिले. माझ्यासाठी तेच खरे क्षण आहेत जे मी सुंदर आठवणी म्हणून सोबत घेऊन जात आहे आणि जे कायम राहतील.”
भारताच्या पाच गडी राखून विजय मिळवल्यानंतर लगेचच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी २१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.