
मोदी सरकारकडून अपमान?
दिल्लीमध्ये भगवा फडकवणार्या छत्रपती घराण्यातील वंशज खासदार शाहू महाराज यांना मागील दीड वर्षांपासून ‘महाराष्ट्र सदनात’ राहण्याची वेळ आली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज हे कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले होते.
मात्र, खासदारकीची शपथ घेऊन दीड वर्ष झाले तरी त्यांना खासदार निवास मिळालेले नाही. विषयी त्यांनी जाहीर कार्यक्रमात खंत व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या मराठा महासंघाच्या कार्यक्रमाप्रसंगी खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, मी खासदार होऊन दीड वर्षे झाले. परंतु मला अजूनही दिल्लीत घर मिळालेले नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून मला महाराष्ट्र सदन येथे राहावे लागत आहे.
या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे नेते धनंजय महाडिक, शिवसेनेचे नेते आमदार चंद्रदीप नरके हे देखील होते. त्यांच्याच उपस्थित केंद्र सरकार बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
एक वर्षापूर्वी देखील शाहू महाराजांनी या विषयी नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, लोकसभा सदस्य कोणत्याही पक्षाचा असो त्याला केंद्र सरकारने सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. दरम्यान, शाहु महाराजांना दिल्लीत खासदार निवासस्थान मिळत नसल्याने कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर लोकसभेचा निकाल
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक उमेदवार होते. या निवडणुकीत तब्बल दीड लाखांच्या मताधिक्क्याने शाहू महाराज विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले होते.