
वैचारिक मतभेद असले तरी…
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगरच्या वतीने ५ ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या पत्नी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
कार्यक्रम पत्रिकेवर त्यांचे नाव असून त्या अमरावतीमध्ये सर्वत्र वाटप झाल्या आहेत.
मात्र, यानंतर कमलताईंनी संघाच्या कार्यक्रमाला येण्यास कधीच होकार दिलेला नाही, हे संघाचे षडयंत्र आहे, आपण पक्के आंबेडकरवादी आहोत, असे स्पष्टीकरण दिल्याचे पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि कमलताई गवई यांचे चिरंजीव डॉ. राजेंद्र गवई यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून कमलताई या संघाच्या कार्यक्रमाला नक्की जाणार त्यांनी स्वतःही निमंत्रण स्वीकारलेले आहे अशी माहिती दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ऐतिहासिक असा विजयादशमी उत्सव नागपूरमध्ये २ ऑक्टोबरला साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर ५ ऑक्टोबरच्या अमरावतीमधील कार्यक्रमाला कमलताई गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याच्या निमंत्रण पत्रिका शुक्रवारी सर्वत्र वाटप झाल्या.
माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष होते. दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. सध्या त्यांचे चिरंजीव डॉ. राजेंद्र गवई हे स्मारक समितीचे सदस्य आहेत. या परिवारातील कमलताई गवई संघाच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला.
त्यानंतर रविवारी कमलताईंचे स्वलिखित पत्र प्रसार माध्यमांवर आले. यात त्यांनी संघाच्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार असल्याची बातमी धादांत खोटी आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
नेमके काय म्हणाले राजेंद्र गवई
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याच्या निमंत्रण कमलताई गवई यांना मिळालेला आहे. त्यांनी ते स्वीकारलेले आहे. आणि त्या या कार्यक्रमाला जाणार आहेत. यापूर्वीही या कार्यक्रमाला दिवंगत नेते राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब गवई हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. गवई परिवाराचे यापूर्वी पक्ष विरहित संबंध राहिलेले आहेत. प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे संबंध होते.
दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे नजीकचे संबंध होते. त्यामुळेच आईसाहेबांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे. गंगाधर फडणवीस यांच्याशी भावाभावासारखे संबंध होते. वैचारिक मतभेद मात्र वेगळे होते. एकमेकांच्या कार्यक्रमात गेले पाहिजे. कार्यक्रमात गेल्याने आपण विचारधारा स्वीकारतो असं नाही.
आम्ही विचारधारेचे पक्के आहोत. भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यामुळे अनेक लोकांच्या पोटात दुखते. त्यामुळे लोक अशा चुकीच्या टीका करत आहेत. मात्र अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे उत्तम राहील असेही गवई म्हणाले.