
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत.
आज शनिवार दुपारी साडेचार वाजता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे असल्याचं म्हटलं. यावेळी, उद्धव ठाकरेंच्या परत निवडणुका घ्या, असे आव्हान दिल्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत जाहीरपणे आपली भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं भवितव्य काय असेल हे स्पष्ट करतानाच बंडखोरांवरही खोचक शब्दांत निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांचे चक्क आभार व्यक्त केले. तर, बंडखोरांना आव्हानही दिलं आहे. राजीनामे द्या आणि निवडणुका लढा असे चॅलेंजच उद्धव ठाकरेंनी दिले. त्यावर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्युतर दिलं आहे.
राज्यघटनेप्रमाणेच निवडणुका होतील, शिवसेना-भाजप युतीचं हे मजबूत सरकार आहे. एकीकडे 164 आमदारांचे मजबूत सरकार आणि समोर 99 आहेत. 164 बहुमताचं हे सरकार आहे. त्यामुळे, लोकांनी त्यांची कामे आणि समस्या घेऊन आमच्याकडे यावे. आम्ही लोकांच्या हिताची काम करण्यासाठीच हे सरकार स्थापन केलं आहे, ते आम्ही करत राहू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
शिवसेना धनुष्यबाण चिन्ह गमावणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर भूमिका मांडली आहे. धनुष्यबाण आमचाच आहे. तो आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे गटाला खडसावलं. तसेच, मी आजही म्हणतो हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या. मध्यावधी निवडणूक व्हायला हवी. मी चुकलो असेल तर जनता मला घरी बसवेल, अशा शब्दात बंडखोर आमदारांना आव्हान दिलं आहे.