
या देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी एच 1बी व्हिसावरील शुल्क अनेक पटींनी वाढवलं आहे. आता एच 1 बी व्हिसासाठी तब्बल एक लाख अमेरिकनं डॉलर म्हणजेच भारतीय रुपयामध्ये जवळपास 88 लाख रुपये मोजावे लागणार आहे.
याचा सर्वात मोठा फटका हा भरताला बसला आहे. ट्रम्प यांच्या या नव्या निर्णयामुळे ज्या भारतीयांची अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहाण्याची शक्यता आहे. यामुळे अभियंता, डॉक्टर, वैज्ञानिक या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय तरुणांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मात्र याच दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही त्या परदेशातील लोकांचं स्वागत करू ज्यांना अमेरिकेत नोकरीसाठी व्हिसा मिळवणं कठीण बनलं आहे, असं मार्क कार्नी यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यापूर्वी जर्मनीने देखील भारतीय कुशल मनुष्यबळाचं आम्ही आमच्या देशात स्वागत करू असं म्हटलं होतं.
इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार लंडनमध्ये पत्रकारांसोबत बोलताना मार्क कार्नी यांनी म्हटलं की, ही कॅनडासाठी मोठी संधी आहे. पूर्वी एच 1बी व्हिसा प्राप्त करून लोक अमेरिकेत जात होते, मात्र अमेरिकेकडून आता एच1बी व्हिसावर प्रचंड शुल्क लावण्यात आलं आहे, त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही त्यांना अमेरिकेत जाता येणार नाही. अशा लोकांचं आम्ही आमच्या देशात स्वागत करू, खासकरून जे अभियांत्रिकी सारख्या क्षेत्रात कुशल लोकं आहेत, त्यांना कॅनडामध्ये मोठी संधी असल्याचं कॅनडाच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
आम्ही आता लावकरच असा प्रस्ताव तयार करणार आहोत, ज्यामुळे फक्त कुशल मनुष्यबळालाच नाही तर जे आपल्या पहिल्या नोकरीच्या शोधात आहेत, अशा लोकांनाही कॅनडामध्ये नोकरीची संधी मिळू शकेल. ही आमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे, असं देखील यावेळी कार्नी यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेमध्ये खळबळ
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एच 1बी व्हिसावर शुल्क वाढवण्याचा घेतलेला निर्णय आता अमेरिकेवरच उलटल्याचं पहायला मिळत आहे. अभियांत्रिकी, सॉफ्टवेअर अशा क्षेत्रातील अनेक कंपन्या या परदेशातील मनुष्यबळावरच अवलंबून आहेत, त्यामुळे या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे.