
दैनिक चालु वार्ता इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपुरी :- तालुक्यात शनिवारी (दि. २६) सकाळी ६ वाजल्यापासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. केवळ २४ तासांत तब्बल १२७ मिमी पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामात एकूण पर्जन्यमान ४,३७२ मिमीवर पोहोचले आहे.
मुसळधार पावसामुळे आग्रा मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कसारा घाटात धुक्याचे साम्राज्य पसरल्यामुळे वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागले. तालुक्यातील सर्व प्रमुख धरणे भरल्याने भावली, वाकी, वैतरणा व दारणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पश्चिम भागात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग आनंदी असून, भात लागवडीच्या कामांना गती मिळाली आहे. त्रिंगलवाडी, बलायदुरी, आडवण, टाकेघोटी, बोरटेंभे, भावली, मानवेढे, बोर्ली, गिरणारे, टिटोली, नांदगावसदो, पिंपरीसदो, तळेगाव, आवळखेड, दौंडत, चिंचलेखैरे, देवळे, खैरगाव, खंबाळे, इंदोरे, काळूस्ते, शेनवड, मुढेगाव, घोटी, माणिकखांब गावांसह वैतरणा, आहुर्ली, मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव, सांजेगाव, दारणा धरण परिसरात चांगली वृष्टी झाली आहे.
गणेशोत्सव काळात तालुक्यात १० दिवस मुसळधार पावसाने विघ्न आणले होते. सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवावरही पावसाचा परिणाम दिसून येत असून, घाटनदेवी येथील भाविकांची गर्दी लक्षणीय कमी झाली आहे. रात्री होणारे दांडिया कार्यक्रम रद्द झाल्यामुळे तरुणाईमध्ये नाराजी पसरली आहे.रविवारी इगतपुरी शहरातील आठवडे बाजारावरही परिणाम झाला असून, बाजारात दुकाने फारशी लागली नाहीत तसेच ग्राहकांची वर्दळही कमीच होती.
भातशेतीसमोर संकट
मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. साधारणपणे दरवर्षी सुमारे ४ हजार मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा सरासरीवर मात करत जादा पाऊस झाल्यामुळे भातशेतीस नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.