
उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील ‘त्या’ विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया !
राज्यातील मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि इतरही काही भागांत सलग झालेल्या पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खांदेश दौऱ्यावर होते.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे, आश्वासनही दिले. यासंदर्भात, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या एका विधानावरून, त्यांना हात जोडून विनंतीही केली.
गुलाबराव पाटील म्हणाले, यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला. आमदारांनीही त्यांच्या मतदारसंघातील विषय मांडले. आम्ही त्यांना संपूर्ण जिल्ह्याची माहिती दिली आहे. कशा पद्धतीने नुकसान झाले आहे आणि कशा पद्धतीची मदत मिळावी, अशा पद्धतीने लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. यावर, मुख्यमंत्र्यांनीही जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.”
जळगाव जिल्ह्यासंदर्भात बोलताना, जिल्ह्यातील 35 मंडळे तर 65 मीलीमीटरच्या वर आले आहेत. इतर जे आहेत, ते निकश बघून ज्या ठिकाणी पिकाचे नुकसान अधिक दिसत आहे, तेथे पाण्याचा निकष न लावता पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
आदेश देण्यात आले आहेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
यावेळी, उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की, सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, असे विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले, “आमची त्यांना हात जोडून विनंती आहे की, यात राजकारण करू नये.”
काय म्हणाले होते ठाकरे? –
दरम्यान, सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्त केले पाहिजे. त्याचबरोबर ज्या प्रमाणे पंजाबमध्ये त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये, कालबद्ध कार्यक्रम करून जाहीर केले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारने हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी. मी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की, तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ जाहीर करून कालबद्ध पद्धतीने त्याचे वाटप करा. बँकाच्या शेतकऱ्यांना जात असलेल्या नोटिसा थांबवा.
मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल या तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना शासनातर्फे निकषात न अडकता जास्तीत जास्त मदत देण्यात येईल व शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील आणि आमदार अमोल जावळे उपस्थित होते.