
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
मोताळा : दि.१४.मोताळा तालुका लगतच्या बोरखेड ते पलढग (कोमलवाडी) या रस्त्यावरील संरक्षक भिंतीजवळ पावसामुळे रस्ता खचला आहे. या रस्त्याला तातडीने संरक्षक भिंत बांधण्यात यावी, या मागणीसाठी पलढग (कोमलवाडी) येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर बळीराम तायडे यांनी गुरुवारी (ता.१४) सकाळी अकरा वाजता या रस्त्यावर स्वतःला मानेपर्यंत जमिनीत गाडून घेत समाधी आंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे.
बोरखेड ते पलढग (कोमलवाडी) या रस्त्यावरील संरक्षक भिंतीजवळ पावसामुळे रस्ता खचला असून, काही शेतकऱ्यांनी शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी आपापल्या शेतातील रस्त्यामध्ये मोठ्या नाल्या खोदल्या आहेत. त्यामुळे गावात दुचाकी व चारचाकी वाहन येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सोबतच शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्याअभावी शाळेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.
बुलडाणा जिल्हा हा मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. मात्र कोमलवाडी पलढग येथील जिजाऊंच्या लेकींवर एवढा मोठा अन्याय होत आहे. तरी, संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई करून तातडीने रस्ता चांगला करून देण्यात यावा. तसेच खचलेल्या रस्त्याला संरक्षक भिंत बांधून देण्यात यावी, अशी मागणी पलढग (कोमलवाडी) येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर बळीराम तायडे यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जि. प. बुलडाणा यांना सहा जुलै रोजी निवेदनातून केली होती.
सदर मागणी आठ दिवसात पूर्ण न झाल्यास गुरुवारी (ता. १४) विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. दरम्यान, प्रशासनाने या मागणीची कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे गंगाधर तायडे यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता या रस्त्यावर स्वतःला मानेपर्यंत जमिनीत गाडून घेत समाधी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, विद्यार्थी व पालकांनी आंदोलनस्थळी हजेरी लावून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी आंदोलनकर्त्यासह समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. त्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, प्रशासकीय अधिकारी व पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली असून, आंदोलनकर्त्या सोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.