
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर : सततचा पाऊस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष यामुळे गंगापूर पंचायत समितीच्या लेखा विभागाच्या कार्यालयाचे सिंलिंग कोसळले असून, छताला पावसाच्या पाण्याने गळती लागल्याने शेतकऱ्यांनी विविध योजनेची दाखल केलेली कागदपत्रे भिजत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना काम सोडून कागदपत्रांवरील पाणी पुसण्याची वेळ आली आहे. दरम्यान, या इमारतीची दुरुस्ती त्वरित करावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा माजी बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी दिला आहे. गेल्या आठ दिवसांपासून गंगापूर तालुक्यात दररोज पाऊस पडत असल्याने पंचायत समितीच्या लेखा विभागाच्या कार्यालयातील छतावर साचलेले पाणी बाहेर न पडता कार्यालयात पडत आहे. या पाण्यामुळे लेखा विभागाच्या लेखाधिकारी यांच्या केबिनचे सिंलिंग तुटून खाली पडले. सुदैवाने या ठिकाणी कोणी नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, त्याच विभागाच्या दुसऱ्या केबिनमध्ये बहुगुणी लागवड, गायगोठे व इतर योजनांच्या शेतकऱ्यांनी जमा केलेल्या फाईल्स आहेत. यातील काही फाईल मंजूर करण्यात आलेल्या तर काही फाईल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व फाईल ठेवण्यासाठी पुरेसे कपाट नसल्यामुळे या फायली टेबलवर, खाली जागा मिळेल त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. केबिनचे सिलिंग कोसळल्यामुळे पावसाचे पाणी छतातून टपकत असून, हे पाणी फायलींवर पडत आहे. आहे. त्यामुळे फायली खराब होत आहेत. या फायली ठेवण्यासाठी दुसरी जागा नसल्यामुळे आहे त्याच ठिकाणी या फायली वळवण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांना कार्यालयातील इतर कामे सोडावे लागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या छताची दुरुस्ती करण्याबाबत पंचायत समितीच्या वतीने संबंधित बांधकाम विभागाला कळविण्यात आले होते. मात्र, त्यांनी दखल न घेतल्याने अखेर आता कर्मचाऱ्यांनी एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालयाच्या छताची स्वखर्चाने डागडुजी सुरू केली आहे. मात्र, या खोल्यांची दुरुस्ती लवकर नाही झाली तर शेतकऱ्यांच्या अनेक फायली खराब होऊन अनेक शेतकरी विविध योजने पासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. —————————————-
अनेक वेळा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी सांगूनही या इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. शिवाय फायली ठेवण्यासाठी कपाट अपुरे पडत आहेत. त्यामुळे आम्हाला विविध योजनांच्या फाईल्स टेबलावर व भिंतीला लावून ठेवाव्या लागतात. फाईल्स ठेवण्यासाठी कपाट उपलब्ध करून देण्यात यावे व छतावरुन पडणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा.
– अनिल रोकडे (कक्ष अधिकारी)——————————-——— गंगापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी बहुगुणी लागवड, गायगोठे व विविध योजनांच्या लाभासाठी अनेक कागदपत्रे जमा करून पंचायत समितीकडे फाईली मंजुरीसाठी दिलेल्या आहेत. परंतु, या कार्यालयात पाणी पडत असल्याने कागदपत्रे खराब होत आहेत. या फायलींमधील कागदपत्रे खराब झाल्यास शेतकऱ्यांना विविध लाभांपासून वंचित लागेल. त्यामुळे या कार्यालयाची दुरुस्ती लवकर करावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल, याची नोंद घ्यावी.
– संतोष जाधव (माजी बांधकाम सभापती, जिल्हा परिषद)