
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : देशातील सत्ता विशिष्ट लोकांच्या हाती केंद्रीत झाली आहे. ते म्हणतील त्याप्रमाणे देशाचा कारभार चालवायचा ही भूमिका घेतली जात आहे. अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर होत असेल तर ती टिकत नाही.
देशाची सत्ता एकहाती एकवटली की श्रीलंकेसारखी स्थिती होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
नागपूरमध्ये आयोजित पदाधिकारी मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी श्रीलंकेतील राजकीय स्थितीचे उदाहरण देत मोदी सरकारच्या मनमानी कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. आज ठिकठिकाणी अधिकारांचा गैरवापर केला जात आहे. दहशत निर्माण केली जात आहे. पण कितीही केलं तरी या गोष्टी टिकत नसतात. कारण सत्तेचा दोष असतो, तो म्हणजे सत्ता केंद्रित झाली की ती भ्रष्ट होते, असा टोला शरद पवार यांनी पेंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भाजपला लगावला.
दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील सरकार घालवले
देशाचं राजकारण ज्यांच्या हातात आहे त्यांनी सत्ता केंद्रित केली असून त्याच्या जोरावर विरोधी आवाज बंद पाडायचं हे सूत्र हाती घेतलं आहे. मध्य प्रदेशमध्येही आपण काय झालं हे पाहिलं. कर्नाटकमधील सरकारही याचप्रमाणे पाडण्यात आलं. महाराष्ट्रातही शिवसेनेच्या काही लोकांना हाताशी घेऊन चांगलं चाललेलं सरकार सत्तेला बाजूला करण्याचा निर्णय दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी घेतला, असा आरोप शरद पवार यांनी केला.
मविआने आगामी निवडणुका एकत्र लढवाव्यात
महापालिकेसह आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्र लढवाव्या असे माझेही मत आहे. पण, शिवसेना आणि काँग्रेसशी चर्चा करून सहमतीने निर्णय घ्यावा लागेल. निवडणुका एकत्र लढल्यास लोकांना हवा तसा निर्णय घेण्याची संधी मिळेल. या विषयावर सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ, असे शरद पवार म्हणाले.
शिवसेनेने भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा दिला आहे. यावर प्रत्येक राजकीय पक्षाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे शरद पवार म्हणाले.
सत्तेचा गैरवापर झाल्यास लोक आवाज उठवतात
श्रीलंकेत एका कुटुंबाकडे राष्ट्रपती, संरक्षण, पंतप्रधान पद होतं. सत्ता केंद्रीत झाली होती. कोणी विरोध केला तर तुरुंगात टाकणार अशा गोष्टी झाल्या. आज तिथे राष्ट्रपतींच्या घरात घुसून संघर्ष केला जात आहे. सत्तेचा गैरवापर होत असेल तर ती टिकत नसते. लोक आवाज उठवत असतात आणि श्रीलंकेत तेच घडलेलं सगळं जग पाहतंय, असे पवार म्हणाले.