
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील परतवाडा-बहिरम मार्गावर रविवारी उशिरा रात्री दुचाकी आणि इर्टिका कारमध्ये जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात ६ ठार तर १ जखमी आहे.या घटनेने चांदूरबाजार तालुक्यात शोककळा पसरली असून मृतांमध्ये पांडुरंग रघुनाथ शनवारे (वय ३० रा. बोदड ता चांदूर बाजार),सतीश सुखदेव शनवारे (वय ३० रा.बहिरम कारंजा),सुरेश विठ्ठल निर्मळे (वय २५ रा.खरपी),रमेश धुर्वे (इर्टिका चालक वय ३० रा.सालेपूर),प्रतीक दिनेशराव मांडवकर (दुचाकी चालक,(वय २६ वर्ष),अक्षय सुभाष देशकर (वय २६ रा.बोदड,ता.चांदूर बाजार) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.तर संजय गजानन गायन (वय २२,रा.बोदड,ता.चांदूर बाजार) असे जखमी युवकाचे नाव आहे.
माहितीसुत्रानुसार,दोघे जण बाईकवरुन गावी जायला निघाले होते.त्याचवेळी भरधाव इर्टिका कार चालकाने मागून दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेत दुचाकीस्वार तरुण पुलावरुन थेट खाली फेकला गेला.या तरुणाचा जबर मार लागून जागीच मृत्यू झाला.दरम्यानच इर्टिका कार चालकाचेही नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.तेव्हा या गाडीत उपरोक्त मृतक होते.शिरजगाव पोलीस स्टेशनचे अंमलदार हे रात्री गस्तीवर असतांना त्यांना रोडवरील पुलाजवळ मोटरसायकलची सीट पडलेली दिसली.त्यांनी त्या ठिकाणी थांबून पाहणी केली असता अपघात झाल्याचे दिसून आले.अपघातातील जखमी व मृतक हे वाहनात फसलेले होते.त्यांना वाहनाबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवण्यात आले.अपघात इतका भीषण होता की,इनोव्हा कारचा अक्षरशः चुरा झाला.ह्या अपघातामुळे परतवाडा–बहिरम मार्गावरची वाहतूकही विस्कळीत झाली होती.अखेर अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.या अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलीसांनी मृताकांना व जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.सध्यास्थितीत या अपघातामधील एका जखमीवर उपचार सुरु आहेत.