
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी वेगात
सर्वांनी सहभागी होण्याचे एकनाथराव जाधव यांचे आवाहन
शिऊर: श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान शिऊर फडाचा २७७ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह २ ते ९ ऑगस्ट दरम्यान श्री क्षेत्र शिऊर येथे होणार असून या सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अन्नदान तसेच नामवंत महाराज मंडळींच्या वाणीतून कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानदान होणार आहे, या सप्ताह मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी केले आहे.
श्री संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिर कार्यालयात दि.१८ जुलै रोजी सप्ताह आढावा बैठक पार पडली , यात सप्ताहच्या तयारी बाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
कोविड च्या प्रादुर्भावानंतर व्यापक प्रमाणात हा सप्ताह होणार असून सप्ताह समाप्ती अर्थात काल्याचे कीर्तनाचे दिवशी एक लाख भाविकांची उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्या दृष्टीने महाप्रसादाची तयारी सुरू करण्यात येणार आहे.
श्री संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिर प्रांगणात हा सप्ताह होणार असून जवळपास तेवीस हजार स्वेअर फुटाच्या भव्य कीर्तन मंडपातून ज्ञानदान होणार आहे, एलईडी स्क्रिनच्या माध्यमातून या सप्ताहाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे एकनाथराव जाधव यांनी सांगितले. ६००० स्वेअर फूट च्या मंडपातून स्वयंपाक तयार केला जाणार असून तब्बल ९ चुलांगणाच्या माध्यमातून प्रसाद तयार केला जाणार आहे, या सोबतच जवळपास ११० गावातून भाकरी येणार आहे.
या बैठकीत संस्थानचे उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे, कार्याध्यक्ष पोपटराव जाधव, नितीन चुडीवाल, बंडोपंत लाखेस्वामी, रामभाऊ महाराज मगर, प्रभाकर आढाव, कचरू जाधव, रामभाऊ जाधव, शिवाजी साळुंके, वाल्मिक भावसार, शिवाजी जाडे, अर्जुन क्षीरसागर, आसाराम जाधव, दीपक गाजरे आदींची उपस्थिती होती.