
दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी -विजय उंडे
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आगार प्रमुखांना दिले निवेदन
तालुक्याच्या उत्तर भागातील वारणवाडी, पोखरी, म्हसोबा झाप, शिंदेवाडी, गुरेवाडी, भोरवाडी, कन्हेर, ढगेवाडी, डोंगरवाडी, पळसपुर, कर्जुले हर्या या ग्रामीण भागातून ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अहमदनगर, पारनेर, टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी शिक्षणासाठी यावे लागते.तसेच परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे हे लक्षात घेऊन म्हसोबा झाप ग्रामपंचायत चे सरपंच प्रकाश गाजरे यांनी पारनेर आगार प्रमुख यांची भेट घेत निवेदन दिले व बस चालू करण्याची मागणी केली. बस सुरू न केल्यास दि. १ ऑगस्ट रोजी सर्व विद्यार्थ्यांसह पारनेर बस स्थानकामध्ये आंदोलन करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड आपण थांबवावी.
तालुक्याच्या उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो.या भागांमध्ये वेळेवर बस येत नाही व सध्या कोरोनामध्ये बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांची विद्यार्थ्यांची महिलांची व ज्येष्ठांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे हे लक्षात घेऊन बस सुरू करण्या संबंधीचे आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर काटाळवेढा गावचे सरपंच पियुष गाजरे, पळसपुर गावच्या सरपंच सुवर्णा आहेर यांच्याही सह्या आहेत.
यावेळी बोलताना सरपंच प्रकाश गाजरे म्हणाले की आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो अनेक आदिवासी विद्यार्थी हे टाकळी ढोकेश्वर, पारनेर, आळेफाटा या ठिकाणी शिक्षणासाठी जावे लागते. परंतु या भागामध्ये बस सेवा सुरू नसल्यामुळे प्रवाशांची व विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होत आहे. विद्यार्थी वाजाला प्रामुख्याने मोठ्या अडचणीचा सामना प्रवासादरम्यान करावा लागत आहे त्यामुळे एसटी महामंडळाने त्वरित वारणवाडी मुक्कामी बस सेवा सुरू करावी अन्यथा आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ असा इशाराच सरपंच गाजरे यांनी पारनेर आगार एसटी महामंडळ प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान बस सेवा सुरू होण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले यावेळी शांताराम बेलकर, अरुण बेलकर हे ग्रामस्थ उपस्थित होते.