
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
औरंगाबाद– पुणे महामार्गावरील भेंडाळा फाट्याजवळ ट्रक-मोटरसायकलच्या अपघातात दोन विद्यार्थी ठार झाल्याची घटना समोर आली आहे. हैद्राबादला जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अपघात मृत्यू झालेले हे दोन्ही मित्र एकाच गावातील असून, लहानपणीचे वर्गमित्र असल्याचे सुद्धा समोर आले आहे. आदीत्य रामनाथ सुंब (वय 20, रा, मांजरी ता. गंगापूर) आणि यश उर्फ नयन भाऊसाहेब शेंगुळे (वय 20, रा, मांजरी ता. गंगापूर) असे या दोन्ही तरुणांचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास आदीत्य आणि यश हे मोटारसायकल क्रमांक एम.एच 20 ई.एक्स 6048 वरून औरंगाबादकडे महाविद्यालयत जात होते. दरम्यान औरंगाबाद-पुणे महामार्गावरील भेंडाळा फाट्याजवळ येताच नाशिक येथुन हैद्राबादला जाणारा ट्रक क्रमांक के.ए. 56-4123 आणि तरुणांच्या मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, ज्यात आदीत्य आणि यश यांचा जागीच मृत्यू झाला आहे.