
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
———————
परभणी/हिंगोली :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कावड यात्रेचे औचित्य साधून सोमवार, दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उणीव राहिली जाणार नाही याची दक्षता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व त्यांच्या पूर्ण पोलीस पथकाने घेतली असल्याचे दिसून येत आहे.
आज हिंगोली शहरातील मुख्य चौकात आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने व सुरक्षेच्या दृष्टीने करणे आवश्यक असलेली सुरक्षेविषयीची तयारी व संपूर्ण स्थळाची पहाणी करण्याचे काम पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर हे स्वतः करीत आहेत. त्यांच्या समवेत अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीन देशमुख व अन्य सर्व पोलीस अधिकारी पहाणी करतांना दिसत आहेत. यावेळी कळमनूरी चे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी सुध्दा सदर ठिकाणी उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेविषयी पोलीस अधीक्षक यांच्याकडे चौकशी विषयी चर्चा केल्याचे समजते.
शनिवार-रविवार हे दोन्ही सुट्टीचे दिवस असूनही आजपासून ते संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडला जावा यासाठी शहर व परिसरांत सर्वत्र कायदा व सुव्यवस्थेला कोणतेही गालबोट लागणार नाही याविषयीची पूर्व जबाबदारी म्हणून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असल्याचे समजते. कर्तव्यात कोणतीही कमी राहाणारे नाही, यासाठी सर्व यंत्रणा कामाला जुंपली असल्याचे गुप्त हेर यंत्रणेकडून बोलले जात आहे. नुकतेच राज्यात सत्तांतर झाले असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच हिंगोलीत येत आहेत. मूळ शिवसेना व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेही भिडंत होऊन अचानक कोणताही अनुचित प्रकार घडला जाऊन कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू शकेल अशी कोणतीही घटना घडतात कामा नये, याचीही डोळ्यात तेल घालून सुरक्षा यंत्रणेला पूरेपूर काळजी घ्यावी लागणार आहे. आमदार संतोष बांगर हे शिवसेना सोडून शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. परिणामी जिल्ह्याचे नवे संपर्क प्रमुख श्री. थोरात, माजी खा. वानखेडे आणि त्यांचे समर्थक यांच्यात समन्वय साधला जावा अशी परिस्थिती व शांतता राहिली जाईल असा सलोखा राखणे गरजेचे ठरणार आहे. त्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातील व लगतच्या कांहीं जिल्ह्यातील पोलीस बळ दिमतीला मागवले जाईल अशीही दाट शक्यता आहे.
नगरपरिषद कार्यालय कार्यरत
—————————————-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा आढावा बैठकीचे ही आयोजन केले असल्याचे समजते. त्यासाठी लागणारी कार्यालयीन कामकाजाची तयारी आज शनिवार असूनही कागद पात्रांच्या पूर्व तयारीसाठी आज व उद्या (रविवारी) दिवसभर उघडीच ठेवण्यासाठीचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून दिल्याचे बोलले जात आहे. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने केवळ हिंगोलीच नव्हे तर लगतचे नांदेड व परभणी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेलाही कायदा सुव्यवस्थेच्या द्रष्टीने सजग राहावे लागले तरी आश्चर्य वाटू नये.