
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याने शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी मनपा युनियनच्या वतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.
यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र लढा देण्याचा इशारा कामगारांनी दिला. दरम्यान, या आंदोलनानंतर कामगारांच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन अध्यक्ष उदय भट यांच्या वतीने महापालिका प्रशासनास देण्यात आले.
या आंदोलनावेळी दर महिन्यास निश्चित केलेल्या तारखेस कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, विलंबाने वेतन देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, कामगारांना “पीएफ’ व “इएसआय’चे कार्ड द्यावे, कंत्राटी कामगारांना बंद करण्यात आलेला बोनस, घरभाडेभत्ता पुन्हा सुरू करावा, महापालिका आयुक्तांनी यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार कंत्राटी कामगारांना पुन्हा पगार पावती देण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.