
औंध (ता. खटाव) : महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या ज्येष्ठ वहिनी व युवा उद्योजक अंकुशभाऊ गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. भारतीताई गोरे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद गट औंध मधील महिलांसाठी महिला संवाद मेळावा व हळदीकुंकू समारंभ यमाई मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. “सन्मान मातृशक्तीचा, सन्मान नारीशक्तीचा” हे ब्रीदवाक्य घेऊन झालेल्या या मेळाव्यात भारतीताई गोरे यांनी उपस्थित महिलांचा सन्मान करून त्यांना आकर्षक भेटवस्तू प्रदान केल्या.
या कार्यक्रमास सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय अभिनेत्री मोनिका राठी (इन्स्पेक्टर मंजू), सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व प्रभावी वक्ते किशोर काळोखे, लेखक-निर्माते तेजपाल वाघ तसेच औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
मार्गदर्शनपर भाषणात सुप्रसिद्ध वक्ते किशोर काळोखे म्हणाले की, “स्त्री हे शक्तीचे विद्यापीठ आहे. एखाद्या स्त्रीने जर मनात सकारात्मक विचार ठेवले, तर ती कोणत्याही क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकते. स्त्रीशक्ती ही समाजासाठी प्रेरणास्थान असून तिच्या सामर्थ्यावर समाजाची खरी प्रगती अवलंबून आहे.”
भारतीताई गोरे म्हणाल्या की, “औंध गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील आणि प्रत्येक महिलेला सोबत घेऊनच समाजकार्यात पुढे जाईन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या वेळी अंकुशभाऊ गोरे यांनी सांगितले की, “आपल्या गटातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी येत्या काळात नियोजन करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या मेळाव्यास जिल्हा परिषद गट औंध येथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांसाठी उपवासाच्या फराळाचे आकर्षक नियोजन करण्यात आले होते. अंकुशभाऊ गोरे यांचे बारकाईने केलेले नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळे हा मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.