
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: नांदेड येथील मुख्य तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे दसरा महोत्सवास २६ सप्टेंबरपासून सुरवात झाली असून बुधवारी (ता. पाच) दसऱ्यानिमित्त पारंपरिक धार्मिक दसरा हल्लाबोल (दशहरा महल्ला) कार्यक्रमाने सांगता होणार आहे. त्यासाठी देश विदेशातून शीख भाविक दाखल झाले आहेत.दसऱ्यानिमित्त मुख्य सचखंड गुरुद्वारा येथे २६ सप्टेंबरला श्री चंडी साहिबचे पाठास सुरवात झाली. त्याची समाप्ती मंगळवारी झाली. दोन ते पाच ऑक्टोबर दरम्यान शीख समाजातील विविध कवी, जत्थे यांनी कीर्तन, प्रवचन सादर केले. संत बाबा जोगिंदरसिंगी मोनी साहिब यांच्या स्मरणार्थ आज विशेष कीर्तन दरबारचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी दुपारी साडेबारा ते तीन पर्यंत गुरू साहिबचे पवित्र शस्त्र हे सिंहासन स्थानाच्या प्रमुख द्वारासमोर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. पाठ, भजन, पूजन झाल्यानंतर तिलक आदीची प्रथा पूर्ण करून दुपारी चारला दरबार साहिबमध्ये पूजा, आरती करून दसरा हल्लाबोल मिरवणुकीला सुरवात होईल. मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
अशी निघेल मिरवणूक
या मिरवणुकीत गुरुद्वारा साहिबचे पवित्र निशान, गुरू महाराजांचे घोडे, निहंग सिंघ दल, पंथ, कीर्तनी जत्थे, भजनी मंडळींसह देश विदेशातून आलेले शीख भाविक सहभागी होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे ही मिरवणुक गुरुद्वारा गेट क्रमांक एक येथून निघेल. त्यानंतर गुरुद्वारा चौरस्ता, हल्लाबोल चौक येथे आल्यानंतर हल्लाबोल कार्यक्रम होईल. त्यानंतर गुरुद्वारा बाऊली साहिब येथे विश्राम करून भजन, कीर्तन करत गुरुद्वारा नगीना घाट येथून गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब येथे रात्री सांगता होईल, अशी माहिती गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे देण्यात आली.