
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील विद्यानगरी परिसरात दिवाळी निमित्त गावी गेलेले नामदेव निलावार यांचे घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दोन लाख सतरा हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.
मागील काही दिवसांत चोरट्यांनी अनेक घरे फोडून कमालीचा हैदोस घातला आहे. मोबाईल शॉपी सोडले तर बाकी सगळ्या घर फोडीच्या घटना दिवाळीनिमित्त गावी गेल्यानंतरच घडल्या आहेत. दिवसा बंद घरांची रेकी करायची व सुमसान रात्रीच्या वेळी घर धुलाई असा हा चोरीचा गोरखधंदा अगदी जोमाने सुरू असल्याचे परभणी शहर व परिसरात होत आहे तरीही पोलीस मात्र काहीही घडले नसल्याच्याच भूमिकेत वावरत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनंतरही सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत धरून व चोरांच्या दहशतीखालीच वावरावे लागते ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. चोर, लूटारु, दरोडेखोर यांचे समूळ उच्चाटन करणे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळे, गुन्हेगारीवर तणावपूर्ण नियंत्रण ठेवणे व नागरिकांना कोणाच्याही दडपणाखाली नव्हे तर मनसोक्तपणे जीवन जगण्याचा हक्क प्रस्थापित करणे ही समुच्चय पोलीस व सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी आहे. तथापि तसे स्वातंत्र्य किंवा अधिकार परभणी शहरात मात्र नक्कीच मिळत नाही. यापेक्षा दुर्दैव ते कोणते म्हणायचे हा खरा सवाल आहे.
नामदेव निलावार हे आपल्या परिवारासह घर बंद करुन दिवाळीनिमित्त गावी गेले होते. परत येऊन घरी पहातात तो त्यांचे घर चोरट्यांनी हात की सफाई करुन धूतले होते. घराची तपासणी केली असता रोख रकमेसह सुमारे दोन लाख सतरा हजारांचा सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. चोरांनी हाथ की सफाई करुन जेवढी काही घरे साफ केली आहेत ती दिवाळीच्या सुट्टीतच केली आहेत. आणखी किती जणांची घरे धुवून साफ केली आहेत, ते जसजसे गावाला गेलेली परत येतील तेव्हा मात्र कळून येणारच आहे. पोलीस गुन्हे नोंदवतील, यथावकाश गुन्ह्यांचा तपासही करतील परंतु त्यातूनही ज्यांचा ऐवज लंपास झाला आहे, तो मिळेलच याचीही शाश्वती देता येणार नाही एवढे नक्की. तोपर्यंत तरी हात चोळत बसण्याशिवाय अन्य काहीच मार्ग नसतो.