
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
देशभरात चर्चेचा विषय बनलेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खा. राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ८ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात पोहोचणार असुन ही यात्रा देगलूर पासून नांदेडकडे जात असताना शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलच्या मैदानावर खा . राहुल गांधी यांचा दि . ८ नोव्हेंबर रोजी रात्री मुक्काम राहणार आहे . भारत जोडो अभियान यात्रा दि . ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता शंकरनगरपासून नरसी , नायगाव मार्गे नांदेडकडे रवाना होणार असल्याने या भारत जोडो अभियान यात्रेत महाराष्ट्रातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुखेड युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल गायकवाड यांनी केले.
देशात भाजपाप्रणित मोदी सरकार सत्तेवर येऊन सात वर्ष झाली , पण देशात महागाई कमी झाली नाही . पेट्रोल , डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत . गरिबी वाढतच चालली आहे . या मुद्द्यावर कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे . त्यांची यात्रा ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार असल्याने महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून खा. राहुल गांधी यांचा पहिला मुक्काम शंकरनगर येथे आहे. त्यांचे भव्य स्वागत करून त्यांची शंकरनगर येथून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता भारत जोडो यात्रा नरसी , नायगांव मार्गे नांदेडकडे जाणार असल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ . वसंतराव चव्हाण, माजी आ.हणमंतराव पा.बेटमोगरेकर यांच्या सह प्रमुख राज्यातील नेते खा . राहुल गांधी यांच्या मुक्कामासह भारत जोडो यात्रेच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे . खा . राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सुमारे ३५७० किलोमीटरचा प्रवास करणार असून ही पदयात्रा ८ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात दाखल होणार आहे . जिल्ह्यात राहुल गांधी सहा रात्र सहा दिवस मुक्कामी असून देगलूर पासून ही पदयात्रा नांदेडकडे रवाना होणार असल्याने खा . राहुलजी गांधी यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील नागरिकांनी, युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन विशाल गायकवाड, उपाध्यक्ष युवक काँग्रेस मुखेड कंधार विधानसभा मतदार संघ, मारोती घाटे, इमरान पठाण, रितेश कांबळे, जयप्रकाश कानगुले, अनिल चौधरी, पृथ्वीसिंह चौव्हान, बालाजी साबणे यांनी केले आहे.