
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी,लढणाऱ्या लेकी साठी बाप बुलंद कहाणी!
कै.अमृतराव क्षीरसागर गुरुजी म्हणजे माझे बाबा यांना आमच्यातून जाऊन आज एक वर्ष पूर्ण झाले.परंतु त्यानंतर असा एकही क्षण गेला नाही की मला बाबांची आठवण झाली नाही.
माझे बाबा म्हणजे दूरदृष्टी लाभलेलं व्यक्तिमत्व….! पन्नास वर्षांपूर्वीच्या काळामध्ये देखील त्यांनी शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक आणि राष्ट्रीय कार्यामध्ये व वाचन चळवळ जीवंत ठेवण्यामध्ये मोलाचा सहभाग दर्शविला. ते एक हाडाचे शिक्षक, उत्तम कथाकार, सुप्रसिद्ध नाट्यलेखक आणि अभिजात कलाकार होते.
बाबांचे व्यक्तिमत्व म्हणजे अष्टपैलू आणि अलौकिक अशा गुणांचे अजब रसायन होते.अनेक कामे नियोजनबद्ध रितीने यशस्वी रित्या पार पाडणारे ते ‘मॅनेजमैंट गुरु’ होते.
खडतर परिस्थितीत मिळेल ती कष्टाची कामे करून त्यांनी त्यांचे शिक्षण घेतले.नोकरी लागल्यानंतरही त्यांनी स्वतःपुरताच स्वार्थी विचार न करता आपल्या भावंडांना भक्कम साथ दिली.90 च्या दशकात दोन मुलींवरच आॅपरेशन करुन कुटुंब कल्याणाचा कृतियुक्त आदर्श त्यांनी घालून दिला.”मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी”हा विचार ते फक्त बोलूनच दाखवला नाही तर त्यांनी तो प्रत्यक्षात आणला.
मुलींचे शिक्षण,अंधश्रद्धा निर्मूलन,वाचन चळवळ यामध्ये त्यांचे कार्य आदर्शवत असे होते.1994 साली जुना लोहा वासियांना वाचनाची गोडी लागावी यासाठी त्यांनी लोहा तालुक्यातील पहिले सार्वजनिक वाचनालय सुरुवात केले.या अद्ययावत वाचनालयाचा संदर्भ व बाबांचे मार्गदर्शन घेऊन नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाचन चळवळ सुरु करण्यात बाबांचा सिंहाचा वाटा होता.
एखादी कथा सांगतांना बाबा एवढे तल्लीन होत की कथेतील पात्र जणू आपल्याशी बोलतच आहे अशा अविर्भावात श्रोते प्रचंड दाद देत असत.अस्सल कथा ऐकावी ती आडगावकर सरांकडूनच…! असा अभिप्राय प्रत्येकजण देत असे.तब्बल पंधरा वर्ष सातत्याने *गुरुवारपुष्प* या उपक्रमात बाबांनी प्रभावी कथाकथनातून श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले.1995 साली संगीत विद्यालयाची स्थापना करुन अनेक कलाकार घडविण्याचे अजरामर कार्य त्यांनी केले.ते स्वतः एक अभिजात कलाकार होते.कलावंत म्हणून लोकनाट्यातून अतिशय महत्वाच्या भुमिका त्यांनी साकारल्या.
बाबांची आई म्हणजे माझी आजी अंध होती त्यामुळे त्यांना दृष्टीदोषअसलेल्या प्रत्येकाबद्दल अतिशय अनुकंपा वाटत असे.स्वतःच्या खर्चाने अनेक दिनदुबळ्यांच्या डोळ्यांचे आॅपरेशन करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले.ते दिनदुबळ्यांसाठी व समाजातील पिछाडलेल्यांसाठी साक्षात देवदुतच होते असे म्हणायला हरकत नाही.बाबांबद्दल मला असे म्हणावे वाटते की,
शुन्यामधूनी विश्व निर्मुनी,
किती सुगंधी वृक्ष फुलवूनी
लोभ माया, प्रीती देवूनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर झाला तुम्ही जीवनी
अमर झाला तुम्ही जीवनी
प्रियंका क्षीरसागर ( गवते ) – पाटील