
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : वडिलांच्या काळापासून घरात हलाखीची गरीबी असल्याने घरातील व स्वतःच्या कोणत्याही गरजा भागविणे अशक्यप्राय झाल्याचा मनस्ताप असह्य झाल्याने मानीलीतल्या एका जीवनाला कंटाळलेल्या तरुणाने काल आत्महत्या केली आहे तर दुसऱ्या एका घटनेत आज एका ५२ वर्षीय इसमाने गरीबी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. एकाच गावात आणि एका पाठोपाठ एक अशा लागोपाठ दोन आत्महत्या झाल्याने मानोली गावासह मानवत तालुक्यात सर्वत्र प्रचंड खळबळ माजली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मानवत तालुक्यात सध्या निवडणुकीची मोठी धामधूम सुरू आहे. एका बाजूला सर्वत्र प्रचाराची राळ उडविली जात आहे तर दुसरीकडे वर्षानुवर्षे गरीबीचे असह्य चटके सोसावे लागणाऱ्या दोघांनी आत्महत्येसारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. परिणामी त्या दोन्ही घरांवर कोसळलेले संकट बघून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मानोली येथील रवी काकडे नामक एका युवकाची कमालीची गरीबी होती. वयाच्या १५ व्या वर्षांपासून वडील सखाराम काकडे सुद्धा गरीबीमुळेच रोज मजूरी करुन उदरनिर्वाह करायचे. त्यातच मुलीच्या उपचारासाठी यांना सारखे मुंबईला हेलपाटे मारावे लागत असत. मागील तीन दिवसांपासून चप्पल घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे रवी चक्क अनवाणीच फिरत होता. अशाप्रकारच्या हलाखीच्या जीवनाचा त्रास असह्य झाल्याने रवीने काल टोकाचे पाऊल उचलले व अखेर आत्महत्या करुन आपले जीवन संपविले. रवी हा सखाराम काकडे यांचा एकुलता एक पुत्र होता.
दुसऱ्या एका घटनेत आज सकाळी ज्ञानोबा ग्यानदेवराव भांड या ५२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तीन एकर शेती असूनही त्यात म्हणावे तसे उत्पन्न होत नव्हते. उपजिविका भागविण्यासाठी मजूरी करणे भाग पडत होते. अगोदरच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ज्ञानदेव यांना जीवन जगणे असह्य झाले. हलाखीची गरीबी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ज्ञानदेव भांड यांनी झाडाला गळफास लावून आपली जीवन मायाच्या संपविल्याचे बोलले जात आहे. एकापाठोपाठ एक अशा सलग दोन दिवसात दोन आत्महत्या घडल्याने मानोली गावासह मानवत तालुक्यात प्रचंड खळबळ माजली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे एवढे खरे.