
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,शिक्षण फी परीक्षा योजना,राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती,व्यवसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता,व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येतात.अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे तसेच नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी शासनाचे http://mahadbtmahait.gov.in हे महाडीबीटी संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.
नोंदणीकृत अर्जाची संख्या जलद गतीने वाढविण्यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील योजनेस पात्र सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर त्वरित अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात प्रवेशित विद्यार्थी योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन महाडीबीटी संकेतस्थळावर भरुन घेण्याची कार्यवाही महाविद्यालयीन प्राचार्यांनी करावी.प्रलंबित शिष्यवृत्ती अभावी संबंधित महाविद्यालयातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील,असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.