
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : कर्तव्यात कसूर, हायगाई आणि हलगर्जीपणा या सबबी कोणालाही नगण्य वाटत असल्या तरी त्या कधी कधी बऱ्याच अंशी महागात पडल्या जाऊ शकतात. तद्वतच त्याचा परिणाम किती गंभीर ठरला जाऊ शकतो, सर्व्हिसवर त्याचा किती विपरित परिणाम होऊ शकतो, हे प्रकरण जेव्हा कोणाच्या अंगावर बितले जाते, त्यावेळीच सारे काही उमजले जाते. परभणी जिल्ह्यातील कांही पोलिसांना मात्र हे प्रकरण पूरते अंगलट आले आहे. त्याचाच परिपाक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लिप्त सातही जणांना शासकीय सेवेतून निलंबन करीत कारवाईचा कठोर बडगा उचलला आहे. त्यामुळे संबंधित सातही पोलीस कर्मचाऱ्यांची पूरती गोची झाली आहे एवढे नक्की.
दैनंदिन कर्तव्याबरोबरच पोलिसांना अन्य महत्वाचीही बरीच कामे करावी लागतात. त्यामध्ये विविध राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंत्या, पूण्यतिथ्या, उत्सव, सोहळे, निवडणूका, महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, अधिवेशन त्याशिवाय आयत्यावेळी बदललेले अथवा लावले जाणारे कार्यक्रम अशावेळी पोलिसांना कर्तव्यावर लावले जाते.
त्याचाच एक भाग म्हणून डिसेंबर महिन्यात महापरिनिर्वाण दिन, ग्रामपंचायत निवडणुका, महत्वाच्या व्यक्तींचे दौरेही झाले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्या कर्तव्याला बगल देत काही पोलीस कर्मचाऱ्यांनी परवानगी न घेताच गैरहजर राहून जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केली. ही बाब लक्षात येताच पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी सदरहू कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. त्यामध्ये पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक राजेश वाजपेयी, पोलीस हवालदार नागनाथ फंड, राजकुमार मुंढे, पोलीस नाईक रतीब नबी मोहम्मद शेख, पोलीस शिपाई गजानन पाटील, किरण घोडके, नंदा काळे या महिला कर्मचाऱीसह सातजणांचा समावेश आहे.
शनिवार, दि.१७ डिसेंबर २२ रोजी त्या संबंधीचे आदेश काढले असून सदर कर्मचारी जिंतूर, नानलपेठ, परभणी ग्रामीण, बामणी, पोलीस मुख्यालय आदी ठिकाणी कर्तव्यावर होते. तथापि त्या सर्वांना निलंबन काळात पोलीस मुख्यालय येथेच कर्तव्य स्थळ राहाणार आहे. एकूणच या कारवाईमुळे दलात सर्वत्र आदरयुक्त भीती व्यक्त केली जाणे स्वाभाविक आहे. शिवाय भविष्यात अशी कोणतीही कसूर कोणाकडूनही होणार नाही, असेच दिसून आल्यास नवल वाटू नये.