
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील द्वारका नगरी वसाहत मधील “वामन-गंगा स्मृती निवास” येथे सफला एकादशीच्या औचित्यावर आज धार्मिक सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता.
सौ. शोभा दत्तात्रय कराळे यांच्या निवासस्थानी आयोजित या धार्मिक कार्यक्रमात द्वारका नगरी परिसरातील सुप्रसिद्ध अशा महिला भजनी मंडळाने या कार्यक्रमाला तब्बल सहा तास चांगली रंगत आणली.
देवाधिदेव महादेव, श्री भोलेनाथांचा वार आज सोमवार आणि सफला एकादशी या दुहेरी औचित्यावर आयोजित कार्यक्रमात प्रारंभी भागवद् गीता या प्रसिद्ध ग्रंथाचे संस्कृतमध्ये पठण, सुरेल सुरात अभंग, गौळणी, हरिपाठ, भजन, उत्तरायण गजर आणि आरती असे एकापाठोपाठ एक धार्मिक उपक्रम पार पाडतांना सदर भगिनींनी सुमधूर अशा आवाजाची सुरेल साथ दिली. विठूरायाच्या हरिनामात तल्लीन होऊन मोहक असे गायन केले. सर्वांचा एकसाथ व सुरेल सूर, त्यातला चढ, उतार आणि हावभाव हे सारे विलोभनीय असेच होते. सदर महिला भगिनींनी श्री विठ्ठल-रखुमाईंच्या समोर हरिनामाचा गजर करीत सुरांच्या ठेप्यावर जे नृत्य काम केले ते पंढरी नगरीला साजेसेच होते. यावेळी मृदुंगाचा निनाद व हार्मोनियमच्या सुरेल सुरांची मिळालेली साथ उल्लेखनीय होती.
यात ज्या महिला भगिनींनी सहभाग घेतला होता त्यात सौ. गीरी ताई, सौ. स्वप्ने ताई, श्रीमती काळे ताई, सौ. पांचाळ ताई, सौ. पिंपरे ताई, सौ. घोरपडे ताई, सौ. वेणूताई अवचार, सौ.समुद्रे ताई, सौ. पवार यांनी, सौ. अडकिणे ताई, सौ. सोनवणे ताई आदींचा प्रमुख सहभाग होता. अन्य सहचरिणींनी सुध्दा मोलाचे सहकार्य लाभले होते. दुपारी १२ वाजता सुरुवात झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत टाळ मृदंगाच्या निनादात व सुरेल आवाजात संपन्न झाला. त्यामुळे परिसरातील असंख्य भाविक भक्त महिलांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.