
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : १८ डिसेंबरला झालेल्या मतदानानंतर निकालाची धाकधूक लागलेले जिल्हाभरातील ११९ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सभासदांनी डोळ्यात तेल घालून मतपेट्या जपल्या. मंगळवार, दि. २० रोजी विजयाचा गुलाल कोण उधळणार व पराजयाची धूळ कोणाला चाखावी लागणार, हे ऐकण्यासाठी आतुर झाले कान टवकारत उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते निकालाच्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
त्याशिवाय प्रत्येक राजकीय पक्ष नेत्यांची प्रतिष्ठा सुध्दा पूरती पणाला लागली होती. सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला झालेली सुरुवात दुपारी २ वाजेपर्यंत संपुष्टात आली. जसजसे निकाल बाहेर येत होते तसा तसा विजयाचा गुलाल उधळला जात होता अन् प्रतिस्पर्ध्यांना पराभव मान्य करणे भाग पडले जाते होते. तथापि त्यांच्या मनातही कुठे तरी पराजय व दारुण पराभवाची सर मनाला बोचणारी होती, हे नाकारून चालणारे नव्हते. सर्वत्र विजयाचा जल्लोष साजरा केला जात होता. दुर्दैवाने परभणी, पूर्णा आणि धनगर टाकळी येथे पराभव असह्य न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक व तुफान हाणामारीचे गालबोट लागले गेले तर पूर्णा येथे विहित सीमा ओलांडल्यामुळे पोलिसांना काही उत्साही कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला. ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा, निशाणी अथवा मान्यता यासारखे प्रकार नसले तरी त्या त्या नेत्यांच्या अनुमतीने किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या पॅनेल किंवा आघाड्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली गेली होती. निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत तात्पुरत्या काळापुरता दिलेलं शासन मान्य निवडणूक चिन्ह घेऊन सदर निवडणूका पार पाडल्या गेल्या. तथापि निवडणूक निकालानंतर मात्र चित्र काहिंसं वेगळं बघायला मिळालं, त्यातून प्रत्येक राजकीय पक्ष व नेत्यांनी निवडून आलेले सरपंच व सदस्य हे आमच्याच पक्षाचे असून त्या ग्रामपंचायती सुध्दा आमच्याच पक्षाच्या आहेत अशा प्रकारचे दावे-प्रतिदावे त्या त्या पक्षांचे जिल्हाध्यक्ष व नेतेही करत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर निवडून आलेली ती सर्व विजयी मंडळी आपल्या पक्षात कशी खेचून घेता येतील, यासाठीचे नव-नवे डोरे टाकत आपापल्या परीने त्यांच्याकडून विविध क्लृप्त्या आखण्यावर भर दिला जात असून तो कमालीचा उफाळून आला आहे. तद्वतच प्रत्येक राजकीय पक्षांनी चालवलेली ही कुरघोडीही लपून राहिल्याचे दिसत नाही,ते चुकीचंही ठरणार नाही, अशा प्रकारचा बोलबाला केवळ जनतेमध्येच नाही तर राजकीय विश्लेषक व कार्यकर्त्यांमध्येही ऐकायला मिळत आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आदी सर्व पक्षांनी जो दावा चालविला आहे, ती कॉंग्रेस पक्ष वगळता अन्य सर्वांनीच दो आकडी संख्येवर दावा ठोकला आहे. त्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे ५०, भाजपाने ६०, शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना तर्फे २२, राष्ट्रवादीतर्फे ३० असा दावा केला आहे. तर कॉंग्रेसने मात्र ८ ते ९ ग्रामपंचायतींमध्येच आमचे वर्चस्व असल्याचे सुतोवाच केले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून तसा कोणताही दावा केल्याचे पुढे आले नसले तरी शेतकरी व कष्टकऱ्यांच्या बाजूने त्यांनी ठिकठिकाणी केलेली आंदोलने काहीशी फलदायी ठरल्याचे बोलले जात आहे. यातील अधिकाधिक ग्रा.पं. सरपंच व सदस्यांना गळाला लावून आपापल्या पक्षात खेचण्याचे गनिमी डावपेच सर्वच पक्षातून केले जातील यात तिळमात्र शंका नसावी. दरम्यान तसे झाले तर मात्र आपण निवडून दिलेले सरपंच हे नेमके कोणत्या पक्षात आहेत, यांची संभ्रमावस्था वाढीस लागू शकेल एवढे खरे.