
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
राज्यात झालेल्या सात हजारपेक्षा अधिका ग्रामपंचायत निवडणुकीचे मंगळवारी निकाल हाती आले आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतीचे देखील निकाल समोर आले आहेत. मात्र याचवेळी काही हटके निकालाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील हिरापूर थापटी तांडा ग्रुप ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीचा असाच काही हटके निकाल चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एका संस्थाचालकाच्या विरोधात त्याच्याच संस्थेतील शिपाई मैदानात होता.
पैठण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीची ठरल्या. त्यातच हिरापूर थापटी तांडा ग्रुप ग्रामपंचायतीसाठी झालेली लढत देखील अशीच काही चुरशीची ठरली. कारण या ठिकाणी सरपंच पदाच्या निवडणुकीत संस्थाचालक कल्याण राठोड यांच्याविरोधात त्यांच्याच संस्थेतील शिपाई विनोद बाबू राठोड हे रिंगणात होते. त्यामुळे संस्थाचालक विरुद्ध शिपाई या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अंतिम लढतीत शिवशाही ग्रामविकास पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार विनोद बाबू राठोड (शिपाई) यांनी शेतकरी ग्राम विकास पॅनेलचे कल्याण राठोड (संस्थाचालक) यांना पराभूत केले. त्यामुळे या निकालाची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळाली.
कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पैठण तालुक्यात राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळाला. मात्र यावेळी परंतु पैठण मतदारसंघात जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे वर्चस्व कायम असल्याचे पाहायला मिळाले असून, 22 पैकी 16 जागा त्यांना ताब्यात घेता आल्या आहेत. मात्र असे असले तरीही तालुक्यातील बिडकीन आणि आडूळ या दोन मोठ्या ग्रामपंचायती मात्र ठाकरे गटाच्या ताब्यात गेल्या असल्याने भुमरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.