
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजनेसाठी मातंग समाजातील १२ पोटजातीच्या अर्जदारांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
थेट कर्ज योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ पूर्ण असावे व ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ३ लक्षपेक्षा जास्त नसावे.तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करावी.स्वत: अर्जदाराने कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत जिल्हा कार्यालय येथे मूळ कागदपत्रांसह दाखल करावे.त्रयस्थ अथवा मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत,याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
*थेट कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे*
थेट कर्ज प्रकरणासोबत अर्जदाराचे बँकेचा सिबील क्रेडीट स्कोअर ५०० असावा.जातीचा दाखला,आधारकार्ड,शैक्षणिक दाखला,रेशनकार्ड,पॅनकार्ड यांची छायांकित प्रत,अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र,व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडेपावती,करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा,(नमुना नं.८ लाईट बील व टॅक्स पावती),ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसायासंबंधीत तांत्रिक प्रमाणपत्र,व्यवसायाचे दरपत्रक,तीन पासपोर्ट साईज फोटो,उत्पन्नाचा दाखला,अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज दि.२६ डिसेंबर २०२२ ते २४ जानेवारी २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते ५ वाजेदरम्यान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे,अमरावती येथे सादर करावे असे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांची कळविले आहे.