
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील दलालांचा वाढता सुळसुळाट परिणामी दलाल, कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संगनमताने होत असलेला लाच लुचपतीचा भ्रष्टाचार शिगेला पोहोचला गेला आहे. दलालांच्या मध्यस्थीने लाच दिल्या शिवाय कोणतेही काम होतच नाही. लाच दिली नाही तर वर्ष वर्ष कामे होत नसल्याने शेतकरी, कष्टकरी यांना हेलपाटे घालावे लागत असल्याने ते पूर्णपणे मेटाकुटीला आले आहेत. त्यांच्या पायातील पादत्राणे (चपला) फाटून जात आहेत. त्याचाच परिपाक म्हणून मनसेने घेतलेला तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेऊन आज ठरल्याप्रमाणे संबंधित अर्जदार शेतकरी वर्गाला मनसेतर्फे आज मोफत चपला वाटण्याचा उपक्रम राबविला गेला. मनसेने केलेल्या आरोपांतील वास्तव खरे असल्याचे दस्तूरखुद्द अधिकाऱ्यांनाच मान्य करणे भाग पडले असून भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी वर्गाला मनसेतर्फे केलेल्या वास्तववादी आरोपांचा घाव पूरता वर्मी लागला आहे. किंबहुना त्यासाठीच भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक दत्तू सोनवणे यांनी कबूली देत मनसेच्या आरोपांचे स्वागतच केले आहे. याचाच अर्थ मनसे नेते लाहोटी यांनी पुकारलेल्या आंदोलनाची पहिली भरारी निश्चितच यशस्वी ठरली आहे असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही.
मागील अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या गर्तेत पूरते रुतले गेलेले अधिकारी व कर्मचारी या नीतीमुळे बदनाम झाले आहेत. दलालांच्या वतीनेच आलेली कामे स्वीकारुन मोबदला म्हणून मोठ्या रकमेतील लाच स्वाहा केली जात आहे. लाच दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. इमानदार शेतकरी वर्गाला तर वर्ष वर्ष हेलपाटे मारावे लागत आहेत. परिणामी त्यांच्या चपला फाटल्या जात आहेत. त्यामुळे हजारो नागरिक. पूरे मेटाकुटीला आले असल्याचे बघून मनसेने या भ्रष्टाचारी प्रवृत्ती विरोधात आठ दिवसांपूर्वीच तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
ठरल्याप्रमाणे आज हाती घेतलेले आंदोलन पूर्णत्वास नेऊन मोफत चपला वाटप करण्यात आल्या. मनसेची आक्रमकता नि शेतकऱ्यांची मिळणारी भरभरुन साथ पहाता आज अधिकाऱ्यांनीच गायब होणे पसंत केल्याचे दिसून आले. तथापि उपाधीक्षक दत्तू सोनावणे यांनी मनसेने केलेल्या आरोपांचे स्वागत तर केलेच शिवाय भविष्यात अशी कोणतीही कृती होणार नाही याची काळजी घेत अर्जदार शेतकऱ्यांचा किमती वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल शिवाय कामकाजात ही सुधारणा घडवून आणली जाईल याचे अभिवचन दिले.
मनसे नेते लाहोटी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला कमालीचे यश आले असले तरी एवढ्यावरच समाधान न मानता आगामी काळात खरोखरच सुधारणा होते का नाही, यांचा मागोवा घेतला जाणार असल्याचे सांगून जर सुधारणा झाली नाही तर मात्र अधिक मोठे आंदोलन छेडून या अधिकारी व कर्मचारी वर्गाला सळो की पळो करुन तर सोडले जाईलच शिवाय येथे येणाऱ्या दलालांना ही पळता भूई थोडी केल्याशिवाय मनसे गप्प बसणारच नाही असा निर्वाणीचा इशारा श्री. लाहोटी यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी वर्गाला पूरता दिलासा दिल्यामुळे श्री. लाहोटी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एवढे नक्की.